मुंबई Corona Updates :हिवाळ्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होतीय. दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. त्यातच कोरोनाच्या जेएन 1 या नव्या विषाणूचेही रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी (29 डिसेंबर) महाराष्ट्रात कोरोनाचे 129 नवीन रुग्ण आढळले, अशी माहिती आरोग्य विभागानं दिलीय. तसंच जेएन 1 ची संक्रमीत रुग्णसंख्या आता 10 वर पोहोचली आहे.
रुग्ण संख्येत वाढ :राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 81 लाख 72 हजार 533 झाली असून 479 सक्रिय रुग्ण असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय. आतापर्यंत 80 लाख 23 हजार 487 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.18 टक्के आहे. तर मृत्यूचं प्रमाण 1.81 टक्का आहे. तसंच मिळालेल्या माहितीनुसार, भारतात 28 डिसेंबरपर्यंत जेएन 1 या नव्या विषाणूची 145 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या संदर्भातील नमुने 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान गोळा करण्यात आले होते. केरळमध्ये जेएन 1 ची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.