मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबई पोलिसांकडून आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई शहर व उपनगरातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले पब्स, डिस्कोथेक्स, डान्सबार, ऑर्केस्ट्रा सारख्या गर्दी जमण्याच्या ठिकाणी तात्पुरते बंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. हे बंदी आदेश 31 मार्चपर्यंत लागू असणार असून यात पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापणांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या अगोदर 15 मार्चला मुंबई शहरातील खासगी पर्यटन संस्थांना परदेशात व देशांतर्गत पर्यटकांची ने-आण करण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. 15 मार्च ते 31 मार्च 2020 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. मात्र, खासगी पर्यटन संस्थांसह कोणाला अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करायचा असेल तर मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून ह्याची परवानगी संबंधितांना घ्यावी लागणार आहे.