मुंबई- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर स्वयंचलित वेंडिंग मशीन-कोविड १९ प्रिव्हेंटिव्ह कियोस्क लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायझर आणि हँड ग्लोव्हज रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होतील.
विविध उपनगरीय स्थानकांवरील नियोजित हेल्थ एटीएम व्यतिरिक्त हे कियोस्क असणार आहेत. यापुढे मुंबई विभागाने प्रवाशांच्या साहित्यासाठी निर्जंतुकीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासह सर्व बाजूने सुरक्षित प्रवासची योजनाही आखली आहे.
आरोग्य मंत्रालयाने रेल्वे प्रवाशांसाठी दिलेल्या प्रवासाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बोर्डिंग व प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी फेस कव्हर / मास्क वापरावेत. यासाठी कोविड 19 प्रतिबंधात्मक साहित्य रेल्वेच्या आवारात प्रवाशांसाठी सहज उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. जर एखाद्या प्रवाशाला नवीन मास्क, सॅनिटायझर आणि ग्लोव्हजची आवश्यकता असेल तर मुंबई विभागातील कोविड 19 प्रतिबंधात्मक स्वयंचलित वेंडिंग मशीन डिस्पेंसर मधून ते उपलब्ध होईल.
या स्वयंचलित वेंडिंग मशीन लवकरच न्यू इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडिया स्कीम (एनआयएनएफआरआयएस) अंतर्गत विविध स्थानकांवर उघडली जातील. त्याद्वारे नाममात्र किंमतीत ट्रिपल प्लाय मास्क, हँड सॅनिटायझर बाटली आणि हँड ग्लोव्हज देण्यात येतील. सुरुवातीच्या काळात या मशीन्स छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकांवर सुरु केल्या जातील. एनआयएनएफआरआयएस अंतर्गत सुरू केलेल्या हेल्थ एटीएम व्यतिरिक्त ही नवीन कल्पनेतील वितरक मशीन्स असतील.