मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार सुरु झाला आहे. जगभरात पुन्हा एकदा कोरोना पसरेल असा इशारा आरोग्य संघटनांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्या करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईमध्ये सध्या रोज ५ ते ६ रुग्ण ( Corona Positive patients in Mumbai ) आढळून येत आहेत. त्या रुग्णांची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी केली जाणार आहे. या चाचण्यांसाठी लागणारे नमुने कमी असल्याने राज्यातील इतर लॅबमधून चाचण्या करून घेतल्या जातील. या चाचण्यामधून नवीन कोणता व्हेरियंट आहे का याची माहिती समोर येईल, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले.
जीनोम सिक्वेन्सिंग करणार : देशभरात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेची काय तयारी आहे याबाबत डॉ. संजीवकुमार यांच्याशी संपर्क साधला असता ते बोलत होते. यावेळी बोलताना, मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आहे. रोज ५ ते ६ रुग्ण आढळून येत आहेत. रोज ५ ते ६ रुग्ण नोंद होत आहेत. आम्हाला कस्तुरबा मधील जीनोम सिक्वेन्सिंगसाठी निर्माण करण्यात आलेल्या प्रयोगशाळेत ३७६ सॅम्पल लागतात. ते जमा होई पर्यंत वाट पाहावी लागेल. यासाठी राज्यातील ७ प्रयोगशाळेत कुठल्याही जिल्ह्यातील जीनोम सिक्वेन्सिंग केले जावे असा निर्णय घेण्यासाठी राज्य स्थरावर एक बैठक होणार आहे. सध्या मुंबईमध्ये एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनवर कोणत्याही प्रवाशांचे स्क्रीनिंग केले जात नाही. केंद्र आणि राज्य सरकारने अद्याप कोणत्याही गाईडलाईन दिलेल्या नाहीत. गाईडलाईन आल्यावर त्याची अंमलबजावणी केली जाईल. कोविड सेंटर बंद असले तरी रुग्णालय सज्ज आहेत. सरकारच्या आदेशानुसार आणि गाईडलाईन नुसार कोरोना रुग्णसंख्या बघून खाटा वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे डॉ. संजीवकुमार यांनी सांगितले. मुंबईमध्ये मास्क सक्ती नसली तरी नागरिक स्वताहून मास्कचा वापर करू शकतात, असेही ते म्हणाले.