मुंबई - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याला तत्काळ विलग करत त्याच्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे. असे असताना मुंबईत आजच्या घडीला कित्येक कोरोनाबाधित रुग्णांना बेड मिळत नसल्याने घरातच राहावे लागत आहे. मुंबई महापालिकेचे रुग्णालय असो वा सरकारी वा खासगी, बेडसाठी अनेकांना 10-10 तास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. यादरम्यान बराच वेळ जात असल्याने वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्ण दगावत असल्याचीही उदाहरणे आहेत. अशात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेने कस्तुरबा रुग्णालयासह अन्य रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी बेड राखीव ठेवले. अंदाजे 3 हजार 960 बेड कोव्हिडसाठी आणि 5 हजार 500 बेड नॉन कोव्हिडसाठी राखीव ठेवले. पण नंतर बघता बघता मुंबईतील रुग्णांचा आकडा मोठ्या संख्येने वाढू लागला तेव्हा नायर, जीटी, सेंट जॉर्ज, सेव्हन हिल, ट्रॉमा केयर आदी रुग्णालये कोव्हिड रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आली. पण ही रुग्णालये वाढवल्यानंतरही बेड कमी पडू लागल्याने मैदानात रुग्णालये बांधण्यात आली. बीकेसीत 1008 बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले असून आणखी 1000 बेडचे काम सुरू आहे. तर वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगाव एक्झिबीशन सेंटरमध्येही रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली. पण गेल्या 10 दिवसांपासून मुंबईत दररोज 1200 ते 1800 दरम्यान रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही व्यवस्थाही अपुरी पडत आहेत. आता कोरोनाबाधितांची स्थिती 'कुणी बेड देतं का, बेड' अशी आहे.
22 मेपर्यंत मुंबईतील रुग्णांचा आकडा 27 हजार 251वर पोहोचला आहे. यात 909 रुग्णांचा मृत्यू झाला असून अंदाजे 7000 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या अंदाजे 19 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण अधिक आणि बेड कमी अशी परिस्थिती असल्याने, कोविड रुग्णालय हाऊसफुल झाली आहे. आता नवीन रुग्णांना बेडसाठी वाट पाहावी लागत असल्याचे पालिकेकडून सांगितले जात आहे. तर बेड कमी पडत असल्याने आणि यापुढे रुग्ण आणखी वाढण्याची शक्यता असल्याने आता मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड ताब्यात घेतण्यात येणार आहेत. शिवाय, खासगी रुग्णालयांना पालिकेने जाहीर केलेल्या दरातच कोविड उपचार करावे लागतील. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी झाली तर रुग्णांना नक्कीच दिलासा मिळेल.
पालिकेच्या 1916 हेल्पलाईनवर आतापर्यंत 72 हजार कॉल आले असून त्यातील 21 हजार कॉल केवळ बेडसाठी आहेत. तर, 11 हजार कॉल हे रुग्णवाहिकेसाठीचे आहेत. यावरून रुग्णांचे किती हाल होत आहेत, याची कल्पना येते.
'कुणी बेड देतं का बेड..!' कोरोनाबाधित रुग्णांना वेळेत बेडच मिळेना.. - मुंबईत कोरोनाबाधितांची भयंकर स्थिती
गेल्या 10 दिवसांपासून मुंबईत दररोज 1200 ते 1800 दरम्यान रुग्ण आढळत आहेत. बेडसाठी अनेकांना 10-10 तास वाट पाहावी लागत असल्याचे चित्र आहे. पालिकेच्या 1916 हेल्पलाईनवर आतापर्यंत 72 हजार कॉल आले असून त्यातील 21 हजार कॉल केवळ बेडसाठी आहेत. तर, 11 हजार कॉल हे रुग्णवाहिकेसाठीचे आहेत. यावरून रुग्णाचे किती हाल होत आहेत, याची कल्पना येते.
मनसेचे संदीप देशपांडे यांनी पालिकेचा कारभार भोंगळ असल्याचे म्हणत रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती खुद्द पालिकेच्या वरिष्ठांनाच माहीत नाही, असा यांचा कारभार आहे. हे असेच सुरू राहिले तर, मुंबईत परिस्थिती आणखी गंभीर होईल, असेही ते म्हणाले.
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनीही पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत किती बेड आहेत, कुठल्या रुग्णालयात किती आहेत, त्यात किती रिकामे आहेत, अशी माहिती ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची मागणी केव्हाच पालिकेकडे केली आहे. पण या मागणीकडे पालिकेने कानाडोळा केला आहे. सध्या खरोखरच नवीन रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यांना बेड, रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्ण गंभीर होत आहेत. त्यात काहींना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे आता तरी पालिकेने गंभीर होत ही परिस्थिती हाताळावी, असे गलगली म्हणाले. दरम्यान, याविषयी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.