मुंबई - लॉकडाऊन काळात दिवसरात्र कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील पोलिसांचे कोरोना संक्रमीत होण्याचे प्रमाण वाढतच आहे. गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत 75 ने भर पडली असून राज्यात 1 हजार 964 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यात तब्बल 223 पोलीस अधिकारी असून 1 हजार 741 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, राज्यातील 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
धक्कादायक! कोरोनाग्रस्त पोलिसांचा आकडा पुन्हा वाढला, एकूण संख्या १ हजार ९६४ वर
गेल्या 24 तासात कोरोनाग्रस्त पोलिसांच्या संख्येत 75 ने भर पडली असून राज्यात 1 हजार 964 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. यात तब्बल 223 पोलीस अधिकारी असून 1 हजार 741 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, राज्यातील 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरातील पोलीस दिवसरात्र एक करून प्रयत्न करत आहेत. मात्र, आता पोलिसांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने शासनाच्या चिंतेत भर पडली आहे. समाधानाची बाब म्हणजे, राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 849 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 67 पोलीस अधिकारी व 782 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, अजूनही 1 हजार 95 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 155 पोलीस अधिकारी व 940 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई पोलीस खात्यातील 200 हुन अधिक पोलीस कर्मचारी हे कोरोनातून बरे होऊन पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले आहेत.
लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 15 हजार 723 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यातील 695 जणांवर क्वारंटाईन नियम मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांवर हल्ला होण्याच्या 254 घटना घडल्या असून यात आतापर्यंत पोलिसांनी 833 जणांना अटक केली आहे. कोरोनाच्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 96 हजार 308 कॉल आले असून अवैध वाहतुकीच्या 1 हजार 323 प्रकरणात 72 हजार 755 वाहने जप्त करण्यात आली आहेत. तर, कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफवर 40 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.