मुंबई- मुंबईत कोरोना आटोक्यात आला असल्याने रोज आढळणा-या रुग्णांची संख्या घटली आहे. धारावीसह दादर, माहिम, मरीन लाइन्स, सँडहर्स्ट रोड या परिसरात शून्य रुग्णांची नोंद नोंदवली गेली आहे. शहरातील रुग्ण दुपटीचा कालावधी ही वाढतो आहे. परळमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी ९७८ दिवसांवर पोहोचला आहे. दरम्यान रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्याने योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत कोरोना आटोक्यात; काही भागात शून्य रुग्णांची नोंद - कोरोना मुंबई न्यूज
महिनाभरापासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. रोज सापडणारी रुग्णसंख्या दुपट ते तिपट्टीने कमी झाली आहे. काही भागात शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
रुग्णसंख्या घटली -
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. गेल्या अकरा महिन्यात केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला. परिणामी महिनाभरापासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. रोज सापडणारी रुग्णसंख्या दुपट ते तिपट्टीने कमी झाली आहे. काही भागात शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आधी कोरोनाचा हॉ़टस्पॉट राहिलेल्या धारावीत सहाव्यांदा शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर दादर, माहिम भागातही तीन ते चारवेळा शून्य रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात मरीन लाइन आणि सँडहर्स्ट रोड येथेही प्रत्येकी दोनदा आणि एकदा कोरोना रुग्णांची संख्या शून्य इतकी नोंदवली आहे. तसेच रुग्ण दुपटीचा कालावधीतील वाढही दिलासा देणारा आहे.
कोरोना रुग्णांची संख्या घटली-
नव्या वर्षात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असून ३० जानेवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंतचा आढावा घेतल्यास मुंबईतील कोरोना रुग्णांची रोजची संख्या ३०८ ते ४२५ पर्यंत घसरली आहे. ३१ जानेवारीला कोरोना रुग्णांची संख्या ३७५, ३१ जानेवारीला ४२२, १ फेब्रुवारीला ३०८, २ फेब्रुवारीला ३०७,
३ फेब्रुवारी रोजी ३८५, ४ फेब्रुवारीला ४२५ व ५ फेब्रुवारीस ३७० इतकी नोंदवण्यात आली आहे.
रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ-
मुलुंडमध्ये सध्या रुग्ण दुपटीचा कालावधी ३४९ दिवसांचा आहे. तर इतर विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी ४०० दिवसांवर आहे. त्यात, कुर्लामध्ये ४२०, एल्फिन्स्टन येथे ८०१ दिवस, कांदिवलीमध्ये ८०५, दहिसर ८३१ आणि परळमध्ये सर्वाधिक ९७८ दिवसांवर रुग्ण दुपटीचा कालावधी पोहचला आहे.