विदर्भासाठी पुढचे सात दिवस महत्वाचे! चाचण्या वाढवणे, रुग्णांचा शोध घेण्याच्या कृती दलाच्या सूचना - कोरोना अपडेट विदर्भ
पुढच्या आठवड्याभरात अमरावती, यवतमाळ, नागपूरसारख्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे कडक अंमलबजावणी होण्याची गरज आहे. तशा सूचना राज्य सरकारला करण्यात आल्या आहेत. तर अमरावतीसह विदर्भात आणि जिथे रुग्ण वाढत आहेत, अशा जिल्ह्यात कोरोना चाचण्या तसेच रुग्णांची शोध मोहीम वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती राज्य कोविड कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.
मुंबई- विदर्भात कोरोनाचा कहर वाढत असून अमरावती जिल्हा हा राज्यातील कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ठरला आहे. काल अमरावतीत एका दिवसात हजारहुन अधिक रुग्ण आढळले असताना यवतमाळ, अकोला, नागपूरमध्येही रुग्ण वाढत आहे. यात गंभीर बाब म्हणजे अमरावती-यवतमाळमध्ये नवीन कोरोना प्रकार आढळला असून तो वेगाने पसरतो. त्यामुळे पुढच्या आठवड्याभरात अमरावतीसह विदर्भातील रुग्णांचा आकडा वाढताच राहणार आहे. यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. पण पुढच्या आठवड्याभरात अमरावती, यवतमाळ, नागपूरसारख्या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचे कडक अंमलबजावणी होण्याची गरज आहे. तशा सूचना राज्य सरकारला करण्यात आल्या आहेत. तर अमरावतीसह विदर्भात आणि जिथे रुग्ण वाढत आहेत, अशा जिल्ह्यात कोरोना चाचण्या तसेच रुग्णांची शोध मोहीम वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती राज्य कोविड कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी दिली आहे.
शनिवारी अमरावतीने रुग्णसंख्येत मुंबईला ही टाकले मागे
महाराष्ट्रात मार्च 2020 पासून कॊरोनाचा कहर सुरू झाला. सुरवातीपासून राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर हे कॊरोनाचे हॉटस्पॉट ठरले. पण आरोग्य यंत्रणाच्या प्रयत्नामुळे मागील दोन महिन्यात कॊरोना चांगल्या प्रकारे नियंत्रणात आला होता. पण आता मागील आठवड्यापासून कॊरोना रुग्णांच्या आकड्यात लक्षणीय वाढ होत आहे. त्यात ही आता राज्यात कॊरोनाचा हॉटस्पॉट अमरावती जिल्हा ठरत आहे. तर येथे नव्या म्यूटेशनचा कॊरोना आढळल्याने चिंता वाढली आहे. दरम्यान शनिवारी तर अमरावतीत रुग्ण संख्येचा स्फोट झाला. एका दिवसांत येथे 1005 रुग्ण आढळले. अमरावती जिल्ह्यात 249 तर अमरावती शहरात (मनपा क्षेत्रात) तब्बल 806 कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईला मागे टाकत अमरावती कॊरोनाचा हॉटस्पॉट होत चालले आहे. काल मुंबईतला कॊरोना रुग्णांचा आकडा 897 असताना अमरावतीचा 1005 असा होता.
एनआयव्हीच्या अहवालाची प्रतीक्षा
अमरावती, यवतमाळ येथे कॊरोना नवा स्ट्रेन आढळल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे कॊरोना रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. हा नवा स्ट्रेन भारतीय असून त्याने आपले म्यूटेशन बदलले आहे. त्यामुळे आता कॊरोनाचा संसर्ग आधीच्या, जुन्या कॊरोना पेक्षा जास्त आहे. हे मागील पाच दिवसांत वाढत चाललेल्या अमरावतीतील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुढचा आठवडा महत्वाचा आहे. जितक्या जास्त चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होईल तितके आपण कोरोनाला रोखून ठेवू शकतो. त्यामुळे चाचण्या-ट्रेसिंग वाढवण्याचा सल्ला सूचना केल्याचे डॉ पंडीत यांनी सांगितले आहे. दरम्यान हा नवा स्ट्रेन नेमका कसा आहे, त्याचे गुणधर्म काय आहेत हे समजल्यावरच आपण त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करू शकतो. तेव्हा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही) पुणे, यांच्याकडून अहवाल कधी येतो याकडे आमचे लक्ष आहे. येत्या दोन-तीन दिवसांत अहवाल येणे अपेक्षित आहे. तो आला की आपण या कॊरोनालाही रोखू. पण तोपर्यंत नियमांचे कडक पालन गरजेचे आहे असेही डॉ पंडीत यांनी सांगितले आहे. दरम्यान नवा स्ट्रेन वेगाने पसरत असल्याने पुढचे 15 दिवस तरी अमरावती, यवतमाळमधील रुग्ण संख्या वाढतीच असेल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डोअर टू डोअर स्क्रीनिग पुन्हा सुरू!
मुंबईसह राज्यभर कोरोना वाढत आहे. तेव्हा हे वाढते संक्रमण रोखण्यासाठी आता डोअर टू डोअर थर्मल स्क्रीनिग सुरू करावी लागली तर लवकरच ती सुरू करण्यात येईल, असे संकेतही डॉ. पंडित यांनी दिले आहेत. आता एका रुग्णांच्या मागे 8 ते 10 कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत आहे. ते वाढवले तर ही नवी लाट रोखता येईल असे म्हणत त्यांनी स्क्रीनिंग सुरू होण्याचे संकेत दिले आहेत.