मुंबई- राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सर्वांनाच नको झालेली टाळेबंदी/संचारबंदी पुन्हा लागू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सध्या कोरोनाचा विशेष प्रार्दुभाव असलेल्या विदर्भात बहुतांश जिल्ह्यांमध्ये दैनंदिन व्यवहारांवर बंधने आली आहेत. अमरावती विभागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता विभागीय आयुक्तांनी नवीन निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यांमध्ये आस्थापने उघडण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी करण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांसाठी ही वेळ सकाळी 8 ते दुपारी 3 करण्यात आली आहे.
विदर्भात टाळेबंदी/ संचारबंदी
अमरावती शहर आणि अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात सात दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. नव्याने कोरोना रुग्ण वाढू लागल्यानंतर लागू झालेली ही पहिलीच टाळेबंदी आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला. उद्या (दि.२२ सोमवार) सायंकाळी आठ वाजल्यापासून एक आठवड्यासाठी टाळेबंदी लागू असणार आहे.
अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दर रविवारी 24 तास संचारबंदीचे आदेश दिले आहेत. संचारबंदीमुळे आज शहरातील सर्व व्यापार, बाजारपेठा बंद आहेत. प्रत्येक चौकांमध्ये पोलिसांचा तगडा पहारा आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. वाशिम जिल्ह्यात आजपासून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू झाली आहे. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद राहणार आहेत, लग्न समारंभासाठी पूर्वपरवानगी बंधनकारक केली आहे.
नागपुरातही कोरोनाचे वाढते संकट पाहता शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. नववी आणि दहावी या वर्गांच्या परीक्षा घेणे गरजेचे असल्याने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. खासगी शिकवणी वर्गांमध्येही कडक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली.