दिलासादायक..! राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्क्यांहून अधिक - कोरोना व्हायरस महाराष्ट्र बातमी
राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने अद्याप प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसून कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाची स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक आहे.
मुंबई- राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टीव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात सोमवारी पाच हजार ७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ४९ झाली आहे. दरम्यान, सोमवारी २ हजार ७८६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ५० हजार ५५४ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात सध्या ५५ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९७ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख ६९ हजार ९९४ नमुन्यांपैकी १ लाख १० हजार ७४४ नमूने पॉझिटिव्ह (१६.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ८९ हजार १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १ हजार ५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
राज्यात सोमवारी १७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय आकडेवारी- ठाणे- १४३ (मुंबई ६८, वसई-विरार २०, मीरा-भाईंदर १३, नवी मुंबई १२, ठाणे १२, पनवेल ७, कल्याण-डोंबिवली ९, पालघर १, रायगड १), पुणे- १६ (पुणे १४, सोलापूर २), नाशिक-१६ (धुळे १३, जळगाव ३), कोल्हापूर-१ (रत्नागिरी १), औरंगाबाद-२ (जालना २).
सोमवारी नोंद झालेल्या १७८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ९१ रुग्ण आहेत. तर ७४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १३ जण ४० वर्षांखालील आहे. यापैकी ४१ जणांच्या इतर आजाराबद्दल माहिती उपलब्ध नाही. उर्वरित १३७ रुग्णांपैकी ९५ जणांमध्ये (६९.३४ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ४ हजार १२८ झाली आहे.
सोमवारी नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २९ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू या पूर्वीच्या कालावधीतील आहेत. पूर्वीच्या कालावधीतील १४९ मृत्यूंपैकी मुंबई ६३, वसई विरार – १९, मीरा भाईंदर – १२, नवी मुंबई -१२, धुळे -१०, ठाणे -११ , पनवेल -७, कल्याण डोंबिवली – ८, जळगाव – २, जालना -२, पालघर – १, सोलापूर -१ आणि रायगड -१ मृत्यू असे आहेत.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्यावतीने मे २०२० मध्ये देशातील ८३ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने समाजाधारित सिरो-सर्व्हे करण्यात आला. त्यात महाराष्ट्रातील अहमदनगर, बीड, जळगाव, परभणी, नांदेड आणि सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोनाचा कितपत प्रसार झाला आहे, हे जाणून घेण्याकरता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. या जिल्ह्यामधे रॅन्डम पध्दतीने निवडलेल्या १० समुहातील प्रत्येकी ४० जणांची अशी एकूण ४०० लोकांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू संस्थेने विकसित केलेल्या इलायझा पद्धतीने करण्यात आली आली. या प्रकारे या व्यक्तींच्या रक्तद्रवामधील प्रतिपिंडांचा (ॲन्टीबॉडी) शोध घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प असून लॉकडाऊन धोरण यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. परंतु, याचा दुसरा अर्थ राज्यातील बहुसंख्य लोकसंख्येमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने अद्याप प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नसून कोरोना प्रतिबंध व नियंत्रणासाठी शारिरिक अंतर राखणे, हातांची स्वच्छता, श्वसनसंस्थेची स्वच्छता, नेहमी स्पर्श होणाऱ्या पृष्ठभागाची स्वच्छता या उपायांवर भर देणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळातही प्रभावी सर्वेक्षण आणि काटेकोर कंटेनमेंट धोरण यावर भर देणे आवश्यक राहणार आहे.