मुंबई - मुंबईत झपाट्याने वाढलेली कोरोना रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. तब्बल ८ ते ११ हजारांवर गेलेली रुग्णसंख्या आता एक हजार ते १३००वर आली आहे. तर, दुसरीकडे ३५ ते ४०वर घसरलेला रुग्ण दुपटीचा कालावधीही २६९ इतका वाढला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला
मुंबईत आटोक्यात आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारीच्या १५ तारखेपासून झपाटयाने वाढत गेली. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही कमी झाल्याने पालिका प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. १ मे रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ९६ दिवसांवर घसरला होता. यावेळी ३९०८वर रुग्णसंख्या होती. मात्र, त्यानंतर रुग्णसंख्या घटत गेली आणि रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढत गेला. दोन दिवसांपूर्वी रुग्णसंख्या मोठ्या फरकारने कमी होऊन ९५०वर आली आहे. तर, रुग्ण दुपटीचा कालावधी २६९ इतका वाढला आहे. या आकडेवारीमुळे मुंबईतील कोरोनाने बिघडलेली स्थिती सुधारत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.