मुंबई- राज्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचा परिणाम म्हणून रुग्णवाढीचा वेग मंदावल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर आणि धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती. राज्यात मागील महिन्यात कोरोना रुग्णांचा आकडा २४ हजारापर्यंत पोहोचला होता. मात्र, काल ५ हजार ९८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या १०७ दिवसात राज्यात पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत.
राज्यात काल १२५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोनाचे एकूण १६ लाख रुग्ण असून एकूण ४२ हजार २४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १३ लाख ८५ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात १ लाख ७४ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत काल १ हजार २३४ नवे रुग्ण आढळून आले. ४३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मुंबईत एकूण रुग्णांची संख्या २ लाख ४३ हजार इतकी आहे. ९ हजार ८१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २ लाख १३ हजार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत १९ हजार ९०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईमधील मृत्यू दर ४.१ टक्के इतकी आहे. राज्याचा मृत्यूदर केवळ २.६ असून मृत्यूदर हा केवळ एक टक्क्यावर नेण्याचा आपला उद्देश आहे. त्या दृष्टीने उपाययोजना केले जात असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात जून दरम्यान दिवसाला ५ हजार ४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७ हजार ८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८ हजार ५२२ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर काल ५ हजार ९८४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या १०७ दिवसात राज्यात पहिल्यांदाच इतके कमी रुग्ण एकाच दिवसात आढळून आले आहेत. राज्याप्रमाणे मुंबईतही जून-जुलै दरम्यान रोज २ हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यातही आता गेल्या काही दिवसात घट पाहायला मिळत आहे. काल मुंबईत १ हजार २३४ रुग्ण आढळून आलेत.
राज्याने राबवलेल्या उपाययोजना-
कोविड हा एक संसर्गजन्य आजार असून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना चाचणी करण्यासाठी ४ हजार ५०० रुपये इतका खर्च येत होता. मात्र, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे ही चाचणी खासगी प्रयोगशाळेत केवळ १ हजार २०० रुपयांमध्ये करण्यात येत आहे. तसेच, आरोग्य सुविधा बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या सहा महिन्यांपासून प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रुग्णालयात बेड उपलब्ध करून देणे, चाचण्यांचे दर, ऑक्सिजनची उपलब्धता, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देणे आदी निर्णय सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून घेण्यात आले आहेत.