मुंबई- कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून चेस द व्हायरस, मिशन झिरोसारखे उपक्रम राबवले जातात आहेत. पालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना यश येत असल्याने खार, वांद्रे पूर्व येथील एच पूर्व व माटुंगा वडाळा येथील एफ उत्तर या दोन विभागात रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने १०८ दिवसांचा टप्पा गाठत शतकपूर्ती केली आहे. रुग्ण दुपटीचा हा कालावधी देशातील सर्वाधिक असल्याचा दावा पालिकेने केला आहे.संपूर्ण मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधी ४१ दिवस इतका आहे.
कोविड प्रतिबंधासाठी महापलिका सातत्याने विविध उपाययोजना राबवत आहे. चेस द व्हायरस मोहिमेंतर्गत रुग्णांचा घेण्यात येणारा शोध आणि रुग्णांमागे १५ जणांना प्रभावी क्वारंटाईन, प्रभावी औषधोपचार, निर्जुंतुकीकरण मोहीम राबवल्याने रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. सुरुवातीला कोरोना हॉटस्पॅाट ठरलेले विभाग आता नियंत्रणात आले आहेत. यांमध्ये वांद्रे पूर्व, खार पूर्व इत्यादी भागांचा समावेश असणाऱ्या 'एच पूर्व' व माटुंगा, वडाळा या परिसरांचा समावेश असणाऱ्या 'एफ उत्तर' विभागाने रुग्ण दुपटीच्या कालावधीचा १०८चा टप्पा गाठला आहे.
मुंबई महापालिकेने वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनांना नागरिकांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे. त्यामुळेच कोविड संसर्गास अधिकाधिक प्रतिबंध करण्यास बळ मिळाले आहे. मुंबईकरांचे हे सहकार्य यापुढेही असेच कायम राहील, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.