महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशाबाहेरून आलेल्यांनाच कोरोनाची लागण, मुंबईकरांनो घाबरू नका - चीनच्या हुवांग प्रांतात कोरोना व्हायरस

कोरोना व्हायरसचे 2 पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत सापडले असून, त्यांच्यावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिका प्रशासनानाने आपली यंत्रणा सज्ज केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशनच्या बेडच्या संख्येत वाढ केली आहे.

Corona: Mumbai Municipal Administration ready
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज

By

Published : Mar 12, 2020, 1:44 PM IST

मुंबई - जगभरात थैमान घातलेला कोरोना व्हायरस आता मुंबईपर्यंत पोहोचला आहे. या व्हायरसचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईत सापडले असून, त्यांच्यावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पालिका प्रशासनानाने आपली यंत्रणा सज्ज केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसोलेशनच्या बेडच्या संख्येत वाढ केली आहे. कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने अशाच रुग्णांनी रक्ताची चाचणी करून घ्यावी उगाच रुग्णालयात गर्दी करू नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

चीनच्या हुवांग प्रांतात कोरोना व्हायरस आढळून आला होता. पाहता पाहता हा व्हायरस जगभरात पसरला आहे. या व्हायरसने आतापर्यंत हजारो लोकांचा बळी घेतला आहे. या व्हायरसचे भारतात रुग्ण आढळून आल्यावर मुंबई महापालिकेने आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. कस्तुरबा रुग्णालयात या व्हायरसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात आयसोलेशनचे 28 बेड सज्ज ठेवण्यात आले होते. मात्र, दुबईवरून आलेल्या दोन रुग्णांना पुण्यात नायडू रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या संपर्कात आलेले सहा जण मुंबईत आढळून आले. या सहापैकी चार जणांच्या रक्ताच्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर दोन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत सापडलेल्या दोन रुग्णांना कस्तुरबा रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या निगेटिव्ह येईपर्यंत त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज

पालिकेच्या चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात पालिकेने आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवले होते. त्यात डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांची नेमणूक केली आहे. या रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये 28 बेड सज्ज ठेवण्यात आले होते. त्यात आता वाढ करून 60 बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. कुर्ला भाभा, वांद्रे भाभा, घाटकोपर येथील राजावाडी तसेच जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात 70 आयसोलेशनचे बेड तयार ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणी डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉय यांना प्रशिक्षण देऊन सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

24 तास ओपीडी सेवा - कस्तुरबा रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या चाचण्यांसाठी विशेष ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, किंवा लागण झाल्याचा संशय आहे अशा लोकांच्या रक्त चाचण्या करण्यासाठी ही ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. ही ओपीडी 24 तास सुरू असणार आहे. या ठिकाणी रक्त चाचणी करण्यासाठी दोन मशीन लावण्यात आल्या असून, त्यात पाच ते सहा तासात रिपोर्ट मिळणार आहेत. गर्दी करू नका - कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाच या व्हायरसची लागण होण्याची शक्यता आहे. साधा ताप, सर्दी खोकलाही काही दिवस रहातो. यामुळे लोकांनी घाबरू नये. बाहेरील देशातून आलेल्या लोकांना व त्यांच्यासोबत असलेल्या लोकांना याची लागण झाली आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून कस्तुरबा रुग्णालयात गर्दी करू नये. जर बाहेरील देशातून आलेल्या लोकांना कोरोना झाला असेल आणि त्यांच्या सानिध्यात आलेल्यांना सर्दी, खोकला, ताप आला असेल तर त्यांनी त्वरित कस्तुरबा रुग्णालयात रक्त चाचण्या करून घ्याव्यात असेही आवाहन पालिकेने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details