चंद्रपूर- जिल्ह्यात मागील 24 तासात 120 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 353 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून तीन बाधितांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 28 हजार 110 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 25 हजार 390 झाली आहे. सध्या 2291 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
बापरे..! नागपुरात गुरुवारी ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू - कोरोना लाइव्ह अपडेट बातमी
21:43 April 01
चंद्रपुरात 353 कोरोनाबाधित रुग्णांची भर
21:42 April 01
धारावीत कोरोना रुग्णसंख्या वाढतीच
मुंबई- आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून येथील कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. आज दिवसभरात धारावीत ७१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दादरमध्ये १०४ तर माहिममध्ये १०१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे धारावीतील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ६० ते ७० वर घसरलेली संख्या ६२९ वर पोहचली आहे. दादरमध्ये ९२७ तर माहिममध्ये १०७० ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
21:14 April 01
बापरे..! नागपुरात गुरुवारी ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
नागपूर- आज (गुरुवारी) पुन्हा एकदा उपराजधानी नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. गुरुवारी तब्बल ६० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूचा हा आकडा या वर्षातील सर्वाधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ लागल्याने कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. गेल्या २४ तासात ३६३० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २९२८ कोरोनाबाधितांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे
21:11 April 01
नंदुरबार कोरोनाचे हॉटस्पॉट
नंदुरबार- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक 1 ते 15 एप्रिल या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे 'हॉटस्पॉट' म्हणून नंदुरबार शहर व तालुका तसेच शहादा शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात एकूण 18,417 बाधित रुग्ण आहेत. त्यापैकी नंदुरबार व शहादा येथे एकूण 14,743 बाधित झाले आहेत. तर जिल्ह्यात एकूण 5,655 रुग्ण उपचार घेत आहेत.
19:25 April 01
नांदेडमध्ये रोज बेड वाढवले तरी कमीच पडत असल्याची स्थिती
नांदेड- जिल्ह्यातील कोरोना स्थिती चिंताजनक आहे. प्रशासनाकडून दररोज बेड वाढवले जात असले तरी दैनंदिन बेडचा तुटवडा पडत आहे. बेडची उपलब्धता वाढविण्यात येत असली तरी रुग्ण वाढीचा वेग त्या तुलनेत अधिक असल्याने प्रशासनाचे गणित बिघडत असल्याचे म्हणण्यापेक्षा रुग्ण संख्या व बेडचे ताळमेळ लावण्यात ते कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसते. ही वस्तुस्थिती असली तरी त्यावर प्रभावी उपाय केव्हा शोधला जाईल, असा प्रश्न आता लोक विचारत आहेत.
17:35 April 01
बीडमध्ये 393 जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह तर 9 जणांचा मृत्यू
बीड- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 393 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 9 जणांचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव झालेल्या रुग्णांची संख्या 28 हजार एवढी असून कोरोनाचे सक्रिय रुग्ण 3 हजार एवढे आहेत. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील बँका, निमशासकीय कार्यालये व शिक्षकांना कोरोना चाचणी करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने आदेशित केले आहे.
17:31 April 01
नाशिकमध्ये लशीचा पुरवठा वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांची मागणी
नाशिक- जिल्ह्यात करोनाचा विस्फोट झाला असून रुग्णवाढीच्या संख्येत देशातील पहिल्या दहा शहरात नाशिकचा समावेश आहे. ही वाढ कमी करायची असेल तर लसीकरण वाढवणे हा एकमेव उपाय आहे. पहिला व दुसरा टप्पा मिळून ४० लाख लसींचा पुरवठा करावा या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केंद्राच्या आरोग्य सेवा संचालकांना पाठविले आहे.
15:37 April 01
मुंबईच्या रुग्णालयांमधील बेडची माहिती मिळवण्यासाठी 'या' नंबरवर कॉल करा
13:27 April 01
पहिल्या टप्प्यात कोरोनाला रोखायला सरकार अपयशी
मुंबई -राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
12:55 April 01
नागपुरात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात
नागपूर - आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमे अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात 248 ठिकाणी लसीकरण केंद्र कार्यांवित करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यानुसार आज (दि. 1 एप्रिल) प्रत्येक केंद्रांवर लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे.
12:50 April 01
आजपासून लातूरमधील मोठ्या ग्रामपंचायतीत रात्रीची संचारबंदी
लातूर- जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णासंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका व त्यालगत तीन किलोमिटर त्रिज्येमध्ये लावण्यात आलेले निर्बंध आता जिल्ह्यातील 45 मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्येही 15 एप्रिलपर्यंत लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानूसार मोठ्या ग्रामपंचायतींमध्येही रात्रीची संचारबंदीसह इतर निर्बंध आजपासून (दि. 1 एप्रिल) लागू होणार आहेत.
12:49 April 01
राज्यात 45 वर्षांवरील व्यक्तींना आजपासून लसीकरण
मुंबई - राज्यात कोरोनाच्या संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला आहे. आता 45 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आजपासून (दि. 1 एप्रिल) या लसीकरणाच्या टप्प्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठी 26 लाख 77 हजार कोविशिल्ड लसीचे डोस केंद्राने राज्य सरकारला दिल्याचे समजते.
12:11 April 01
महापालिकेसमोर आंदोलन करणाऱ्या रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू, सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
नाशिक - शहरातील अनेक रुग्णालये फिरूनही दोन कोरोनाग्रस्तांना बाधितांना बेड मिळत नसल्याने या रुग्णांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले होते. मात्र, यातील एका रुग्णाचा बिटको रुग्णालयात उपचारा सुरू असताना मृत्यू झाला. कोरोनाग्रस्त रुग्णाला उपचार सोडून आंदोलनात घेऊन येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12:06 April 01
पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीसह कार्यालयांत कामाव्यतिरिक्त येणाऱ्या नागरिकांना बंदी
पुणे- राज्यासह पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णात होणारी वाढ लक्षात घेता पुणे महापालिकेने महापालिकेच्या मुख्य इमारतीसह विविध परिमंडळ कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त नागरिकांना पूर्णता बंदी घातण्यात आली आहे. बुधवारी (३१ मार्च) दिवसभरात पुण्यात ४ हजार ४५८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात एकूण बाधितांची संख्या ही २ लाख ६९ हजार ३४३ इतकी झाली आहे. पुण्यातील सक्रिय रुग्णसंख्या ३३ हजार ८५८ वर पोहोचली असून एकूण ५ हजार ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
09:37 April 01
किमान दहा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानी द्या, संघटनेची मागणी
कोल्हापूर- टाळेबंदीच्या काळात कामगारांचा रोजगार गेला. दोन महिन्यांपासून थोडा फार आधार मिळाला. पण, पुन्हा हॉटेल्स आठनंतर बंद केले तर दोन तासांत रोजगार करायचे कसे. कामगारांच्या पोटाचे हाल होत आहेत. त्यामुळे किमान 10 वाजेपर्यंत हॉटेल्स धारकांना परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर हॉटेल्स संघटनेने केली आहे.
09:21 April 01
कोरोना लसीकरणाबाबत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम
कोल्हापूर -जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आवाक्यात असले तरी, जिल्हा प्रशासनाने ५०० बेडची व्यवस्था केली आहे. तर लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी जिल्ह्यात आणखीन २२० लसीकरण केंद्र १ एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहेत. ३५० लसीकरण केंद्राच्या माध्यमातून महिनाभरात संपूर्ण लसीकरण पूर्ण केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
06:18 April 01
मुंबईत 5 हजार 394 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू
मुंबई- मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्णसंख्या कमी होत होती. मात्र, फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तीन दिवस तीन हजारावर, त्यानंतर सलग तीन दिवस पाच हजारावर तर दोन दिवस 6 हजाराच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्या घटली होती. बुधवारी (दि. 31 मार्च) पुन्हा त्यात वाढ झाली आहे. 5 हजार 394 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत 51 हजार 411 सक्रिय रुग्ण
कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 14 हजार 714 वर पोहचला आहे. आज 15 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 11 हजार 686 वर पोहचला आहे. 3 हजार 130 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 50 हजार 660 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 51 हजार 411 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 49 दिवस इतका आहे.
06:06 April 01
बापरे..! नागपुरात गुरुवारी ६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत बुधवारी (दि. 31 मार्च) नव्या 39 हजार 544 रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 227 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण होण्याचा दर 85.34 टक्के झाला आहे.
राज्यात 23 हजार 600 रुग्ण गेल्या 24 तासात कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 24 लाख 727 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा 28 लाख 12 हजार 980 वर पोहोचला आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्णासंख्याची 3 लाख 56 हजार 243 इतकी झाली आहे.