मुंबईत ७ ते १४ मार्च या आठवडाभरात रुग्णवाढीचा कालावधी सरासरी ०.४२ टक्के इतका आहे. त्यापैकी अंधेरी पश्चिम येथील के वेस्ट ०.६२ टक्के, मुलुंड टी विभागात ०.५८ टक्के, चेंबूर एम पश्चिम विभागात ०.५७ टक्के, बांद्रा एच पश्चिम विभागात ०.५३ टक्के, माटुंगा एफ उत्तर विभागात ०.५८ टक्के, मानखुर्द गोवंडी एम पूर्व विभागात ०.५० टक्के, गोरेगांव पी साऊथ विभागात ०.४८ टक्के, कुर्ला एल विभागात ०.४५ टक्के, अंधेरी पूर्व ०.४५ टक्के, घाटकोपर एन विभागात ०.४५ टक्के, कांदिवली आर दक्षिण विभागात ०.४४ टक्के, भांडुप एस विभागात ०.४३ टक्के तर खार एच ईस्ट विभागात ०.४५ टक्के इतका रुग्ण वाढीचा दर आहे.
Corona Live Update : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यात कडक निर्बंध
18:18 March 16
मुंबईत ७ ते १४ मार्च दरम्यान रुग्णवाढीचा कालावधी सरासरी ०.४२ टक्के
16:36 March 16
बीडमध्ये टाळेबंदीला विरोध; आरोग्य यंत्रणा वाढवण्याची मागणी
बीड- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी टाळेबंदी नकोच, असा सूर व्यापाऱ्यांचा व सर्वसामान्य नागरिकांचा आहे. बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह सक्रिय रुग्णांची संख्या 550 आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 18 हजार 984 इतकी झालेली आहे. आरोग्य प्रशासनाने तपासणी वाढवली आहे. एकंदरीत या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन टाळेबंदी करण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. अशा वेळी सर्वसामान्य नागरिक, व्यापारी तसेच हातावर पोट असलेल्या सामन्य नागरिकांमधून टाळेबंदी लावण्याला प्रचंड विरोध होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
15:19 March 16
दुपारनंतर नागपुरात गर्दी कमी; कडक टाळेबंदीची अंमलबजावणी
नागपूर- संचारबंदी, अंशत: टाळेबंदी हे पर्याय अवलंबल्यानंतरही कोरोना रुग्णसंख्या वाढतच असल्याने नागपुरात आज अखेर कडक टाळेबंदी लागू करण्यात आली. टाळेबंदी असतानाही सकाळी लोकांची गर्दी रस्त्यावर दिसून आली, मात्र दुपारनंतर आता अनेक ठिकाणी गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे.
13:01 March 16
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पैठण येथील नाथषष्ठी सलग दुसऱ्या वर्षी रद्द
औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढल्याने राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यावर अगोदरच बंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पैठण येतील दरवर्षी भरणारी नाथषष्ठी यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली असल्याची माहिती अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण एका पत्रकाद्वारे दिली. मात्र, मंदिरामध्ये पारंपरिक पूजाअर्चा होणार आहे. गेल्या चारशे वर्षांची परंपरा लाभलेले नाथषष्ठी यात्रा महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा रद्द होण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. याबाबत आज सोमवारी जिल्हा प्रशासनाने अधिसूचना जाहीर केली असून सोहळ्याचे यंदा 423 वे वर्ष होते.
12:02 March 16
कोरोनासंदर्भात केंद्र सरकारचे राज्य सरकारला पत्र
मुंबई -कोरोनाबाबत केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी हे पत्र पाठवले आहे. कोरोना स्थितीवर गंभीर पाऊले उलचली जात नाहीत. दोन आठवड्यापूर्वी केंद्रीय पथक आरोग्य पथकाने महाराष्ट्र राज्याची पाहणी केली. यात १३ मुद्यावर केंद्राने लक्ष वेधले आहे. राज्यात वाईट स्थिती आहे, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. आरोग्य स्थिती चांगली असली तरी राज्यातील परिस्थिती गंभीर आहे.
केंद्राच्या राज्य सरकारला सूचना -
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढविण्याची सूचना
- डेथ ऑडीट पुन्हा सुरू करा
- नाईट कर्फ्यू आणि लॉकडाऊनचा पडत नाही तर आय सोल्युएड झोनमध्ये फरक पडतो
- कंटेन्मेंट झोनची प्रक्रिया पुन्हा राबवावी
12:00 March 16
यवतमाळ : कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र असेल, तरच दुकान उघडण्याची परवानगी
यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा दर वाढतच चाललेला आहे. यवतमाळ शहरासह इतर तालुक्यातही रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळेच छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, चहाटपरी, उपहारगृह, पानटपरी यासह इतर दुकानदारांना कोविडची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. ज्यांच्याकडे तपासणी केल्याचे प्रमाणपत्र आहे, त्यांनाच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. जोपर्यंत तपासणी करणार नाही, तोपर्यंत दुकाने सील करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी दिली आहे.
11:55 March 16
क्वारंटाईन सेंटरमधून पळण्याचा प्रयत्न करणारी तरुणी अडकली खिडकीत; अग्निशमन दलाने केली सुटका
पुणे - पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शहरात अनेक ठिकाणी सेंटर उभारले आहे. नव्याने पॉझिटीव्ह सापडणाऱ्या रुग्णांना या सेंटरमध्ये ठेवण्यात येत आहे. परंतु यातील काही रुग्ण क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. सोमवारी सायंकाळी असाच एक प्रकार उघडकीस आला असून क्वारंटाईन सेंटरमधून पळून जाण्याचा प्रयत्न करणार्या एका 18 वर्षीय तरुणीसोबत असे काही घडले की नंतर अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. ही तरुण खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना खिडकीत अडकली त्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या मुलीची सुटका दिली.
11:21 March 16
आवश्यक सोयीसुविधा नसल्याने संतप्त रुग्णांचा कोविड सेंटरमधून पाय काढता
जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाच्या संसर्गाची स्थिती चिंताजनक होत असताना आरोग्य यंत्रणेला कोणत्याही प्रकारचे सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. याचाच प्रत्यय जामनेरात आला आहे. जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथील धारिवाल पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये उभारलेल्या शासकीय कोविड सेंटरमध्ये रुग्णांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या 50 पैकी 15 रुग्णांनी कोविड सेंटरमधून काढता पाय घेतला.
10:50 March 16
नागपूरात लॉकडाऊनचा दुसरा दिवस, रस्त्यावरील गर्दी कायम
नागपूर - नागपूरात मागील तीन दिवसांत 2 हजाराच्यावर कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. मागील काही दिवसात नागपूरमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने अशंत: लॉकडाऊनच्या पर्यायानंतर कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परंतु दुसऱ्या दिवशी रस्त्यावर लोकांची गर्दी दिसली.
10:26 March 16
एमपीएससी विद्यार्थ्यी आंदोलनादरम्यान बंदोबस्तावरील पाच पोलीस अधिकारी कोरोना बाधित
पुणे -एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात 11 मार्च रोजी मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांनी तब्बल 8 तास लाल बहादूर शास्त्री रस्ता रोखून धरला होता. या आंदोलनादरम्यान पुणे पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर होते. यातील पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
09:29 March 16
राज्यात कडक निर्बंध; तरीरी दादरच्या मार्केटमध्ये गर्दी
मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजपासून राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, याकडे नागरिकांना दुर्लक्ष केले. त्याचा प्रत्यय दादरच्या भाजी मार्केटमध्ये आला. आज भाजी खरेदी करण्यासाठी मुंबईतील दादर मार्केटमध्ये लोकांनी गर्दी केली.
09:15 March 16
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख
अहमदनगर - शहरासह जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णांचा आलेख हा चढता असून रोज सरासरी 500 रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि मनपा प्रशासनाने कडक निर्बंध करण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागापूर उपनगरातील तीन ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित केले आहेत.
06:49 March 16
मुंबईकरांनो काळजी घ्या, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल
मुंबई - डिसेंबर जानेवारीपर्यंत कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याने पुन्हा फेब्रुवारीपासून कोरोना वाढू लागला आहे. मुंबईकरांनी कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल असा निर्वाणीचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. तर नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर अंशतः लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
06:46 March 16
राज्यात या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
- मुंबई महानगरपालिका- 1713
- ठाणे- 204
- ठाणे मनपा- 309
- नवी मुंबई-158
- कल्याण डोंबिवली- 250
- पनवेल मनपा- 153
- नाशिक-332
- नाशिक मनपा-671
- मालेगाव-112
- अहमदनगर- 359
- अहमदनगर मनपा-189
- धुळे मनपा- 212
- जळगाव- 433
- जळगाव मनपा- 267
- नंदुरबार-266
- पुणे- 363
- पुणे मनपा- 1122
- पिंपरी चिंचवड- 898
- सातारा - 149
- औरंगाबाद मनपा- 657
- औरंगाबाद-128
- जालना-174
- बीड - 244
- नांदेड मनपा- 295
- नांदेड-137
- अकोला मनपा- 154
- अमरावती- 141
- अमरावती मनपा- 227
- यवतमाळ-275
- बुलडाणा-349
- वाशिम - 183
- नागपूर- 354
- नागपूर मनपा-2094
06:45 March 16
राज्यातील कोरोनाची स्थिती
- राज्यात 10 हजार 671 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत
- राज्यात आतापर्यंत 21 लाख 44 हजार 743 रुग्णांनी केली कोरोनावर मात
- राज्यात नव्या 15, 051 रुग्णांची नोंद
- राज्यात 48 रुग्णांचा मृत्यु झाला झाला असून मृत्यूदर 2.27 टक्के
- राज्यात एकूण 23 लाख 29 हजार 464 रुग्णांची नोंद
- राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 1 लाख 30 हजार 547
06:12 March 16
राज्यात सोमवारी 15 हजार 051 नव्या कोरोना रुग्णांची भर
मुंबई -राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. राज्यात सोमवारी नव्या 15 हजार 051 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 48 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यूदर 2.27 टक्के इतका आहे, असे असले तरी रुग्ण संख्येचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.