मुंबई: शहरात मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यापासून चार लाटा येऊन गेल्या आहेत. त्यांना थोपवण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. गेली काही महिने रुग्णसंख्या आटोक्यात होती. दिवसाला तीन ते सात रुग्ण आढळून येत होते. यामुळे मुंबईकर नागरिक बिनधास्त झाले होते. मार्चपासून मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचे १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. तर ५० हून अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल असून २२ ते २५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आतापर्यंत एकूण ८१ लाख ४४ हजार ७८० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून १९ हजार ७४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बूस्टर डोसकडे दुर्लक्ष:मार्च २०२० मध्ये कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाल्यावर रुग्णसंख्या तसेच मृत्यूची संख्या वाढत होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जानेवारी २०२१ पासून लसीकरण केले जात आहे. सुरुवातीला रुग्णसंख्या आणि मृत्यू वाढत असल्याने त्याच प्रमाणे प्रवास करताना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घेतले. दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवली आहे. आजही दिवसाला शंभरहून कमी नागरिक बूस्टर डोस घेत आहेत. आतापर्यंत १ कोटी ८ लाख ९३ हजार ४५८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ९८ लाख १४ हजार ८२९ नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर केवळ १४ लाख ८७ हजार ९०९ नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतला आहे. ८३ लाख २६ हजार ९२० नागरिकांनी लसीचा बूस्टर डोस घेतलेला नाही.