महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 26, 2020, 10:31 AM IST

ETV Bharat / state

मुंबईमधील मृतांमध्ये 60 वर्षाहून अधिक वयाच्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक

मुंबईमधील रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता नागरिकांनी इतर आजारांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर आजारांवर असलेले औषधोपचार सुरू ठेवावेत. फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आणि हाताची स्वच्छता नेहमी राखावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

mumbai corona update
संग्रहित छायाचित्र

मुंबई - कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत 24 मेपर्यंत झालेल्या 988 मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे 60 वर्षांवरील रुग्णांचे तर, त्याखालोखाल 40 ते 60 वर्षामधील रुग्णांचे झाले आहेत. एकूण बाधितांपैकी 60 वर्षांवरील रुग्णांच्या मृत्यूंची टक्केवारी 8.1 टक्के तर 40 ते 60 वर्षांमधील रुग्णांच्या मृत्यूची टक्केवारी 4 टक्के इतकी आहे. मुंबईमधील 30359 रुग्णांपैकी 988 रुग्णांचा झाला आहे. याचा मृत्यूदर 3.2 टक्के असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने 24 मेपर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या 30 हजार 359 रुग्णांची तर 988 मृतांची नोंद झाली आहे. त्यात 40 वर्षाखालील 13 हजार 133 रुग्ण असून त्यापैकी 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 40 वर्षाखालील रुग्णांचा मृत्यूदर 0.5 टक्के इतका आहे. 40 ते 60 वर्षामधील 11517 रुग्ण असून त्यापैकी 456 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 40 ते 60 वर्षांमधील मृत्यूदर 4 टक्के इतके आहे. तर 60 वर्षांवरील 5709 रुग्ण असून त्यापैकी 463 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 60 वर्षावरील मृत्यूदर 8.1 टक्के इतका आहे.

मुंबईत 24 मे पर्यंत 30359 रुग्ण होते त्यापैकी 40 टक्के महिला तर 60 टक्के पुरुष रुग्ण आहेत. मुंबईमधील 988 मृतांपैकी 37 टक्के महिला तर 63 टक्के पुरुष रुग्ण आहेत. एकूण मृत्यूपैकी 67 टक्के रुग्णांना इतर आजार होते. त्यात मधुमेहाचे 26 टक्के, उच्च रक्तदाबाचे 24 टक्के, तर 32 टक्के मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे दोन्ही आजार होते. 8 टक्के रुग्णांना हृदयविकार तर 10 टक्के रुग्णांना इतर आजार होते. 60 वर्षांपेक्षा अधिक वय व त्याबरोबर इतर आजार असल्यास जोखमीचे असल्याचे मृत्यू प्रकरणातून निदर्शनास आले आहे. तर 50 वर्षांपेक्षा कमी वयातील मृत्यूंमध्येही 21 टक्के रुग्णांना इतर आजार असल्याचे समोर आले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.

इतर आजारांववरील औषधे वेळेवर घ्या -

मुंबईमधील रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण पाहता नागरिकांनी इतर आजारांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर आजारांवर असलेले औषधोपचार सुरू ठेवावेत. फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर आणि हाताची स्वच्छता नेहमी राखावी, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details