महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तरुणांनो सतर्क रहा! आता जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा - WHO news

आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, आपल्याला काही होणार नाही असा समज करून घेत तरुण बिनधास्त वागत आहेत. त्यामुळेच जगभरात तरुण रुग्ण वाढत आहेत.

कोरोना अपडेट
कोरोना अपडेट

By

Published : Aug 7, 2020, 3:41 PM IST

मुंबई - मार्च ते जूनदरम्यान मुंबईत लहान मुले आणि तरुण अर्थात 20 ते 40 वयोगटामध्ये कोरोनाची लागण खूप कमी होती. पण जुलैमध्ये अनलॉकला सुरुवात झाली आणि लहान मुलांसह तरुणांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत गेले असून आता तरुणांमधील मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे. 6 ऑगस्टला 20 ते 30 वयोगटातील रुग्णांच्या मृत्यूचा आकड्याने शंभरी गाठली आहे. त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेनेही दोन-तीन दिवसांपूर्वीच जगभरात तरुण रुग्णांचा आकडा वाढत असल्यावर चिंता व्यक्त केली. तर तरुणांना सतर्क राहण्याचे आणि सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान मुंबईतील 20 ते 40 वयोगटातील रुग्णांचा आकडा 18 दिवसात 6020ने वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांची ही चिंता वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयेसस यांनी 3 ऑगस्टला एक ट्विट करत तरुणांना सतर्क राहण्याचा इशाराच दिला आहे. जगभरात तरुणांमध्ये कोरोनाची लागण वाढत आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. त्याचवेळी तरुण कोरोनाचे वाहक बनत असून त्यांच्याकडून संसर्ग वाढत असल्याचे म्हणत त्यांनी हा इशारा दिला आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड-19च्या तांत्रिक विशेषज्ञ डॉ. मारिया व्हॉन यांनीही तरुणांना सतर्क राहण्याचा, काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. तरुणांना कोरोनाचा धोका कमी आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, आपल्याला काही होणार नाही असा समज करून घेत तरुण बिनधास्त वागत आहेत. त्यामुळेच जगभरात तरुण रुग्ण वाढत आहेत. तर हे रुग्ण गंभीर होऊन त्यांच्यात मृत्युचा आकडा वाढू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

ही भीती व्यक्त करून तीन दिवस होत नाहीत, तोच मुंबईतील तरुण रुग्णांचा आणि मृत्यूचाही आकडाही वाढला आहे. 18 जुलैला मुंबईत 20 ते 30 वयोगटातील 13897 रुग्ण होते. तर केवळ 18 दिवसात हा आकडा 16445वर गेला आहे. तर 19 जुलैला 86 मृत्यू होते तर 6 ऑगस्टला मृत्यूचा आकडा 100वर गेला आहे. म्हणजेच 18 दिवसात या वयोगटातील 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

30 ते 40 वयोगटातील 17535 रुग्ण 18 जुलैला मुंबईत होते. तिथे आता हा आकडा 20998 वर गेला आहे. तर मृत्युचा आकडा 251वरून 281वर पोहचला आहे. एकूणच 18 दिवसात 20 ते 40 वयोगटातील रुग्णांचा आकडा 6020ने वाढला आहे. तर मृत्यूचा आकडा 44ने वाढला आहे. हा वाढता आकडा आणि आरोग्य संघटनेचा इशारा यामुळे नक्कीच चिंता वाढली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कोविड स्पेशल सेव्हन हिल्स रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्णन अडसूळ यांनीही गेल्या आठवड्याभरात आपल्याकडे दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण वाढते असल्याचे स्पष्ट केले आहे. तर मुळात तरुणाई बेफिकीरपणे वागत असल्यानेच त्यांच्यातील संसर्गाचे आणि मृत्युचे प्रमाण वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळणे गरजेचे असल्याचा सल्ला ही डॉ. अडसूळ यांनी दिला आहे.

दरम्यान, 19 जुलैला 'ईटीव्ही भारत' ने मुंबईत तरुणाई कोरोनाच्या विळख्यात अडकण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सविस्तर वृत्त दिले होते. तर आता जागतिक आरोग्य संघटनेनेही हा इशारा दिला आहे. त्यामुळे आता देशाचे भवितव्य मानल्या जाणाऱ्या तरुणांना कोरोनापासून दूर ठेवण्याचे आव्हान प्रशासन आणि पालकांसमोर उभे ठाकले आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details