मुंबई -मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात दर महिन्याला नवनवीन गृहप्रकल्पाचा शुभारंभ होतो. हजारो घरे विक्रीसाठी येतात. पण कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसला आहे. इतिहासात कधी नव्हे ते पहिल्यांदा तीन महिन्यात एकही घर वा नवीन प्रकल्प एमएमआरमध्ये सुरू झालेला नाही. चालू प्रकल्पासाठीच मंजूरी मिळत नसल्याने आणि आर्थिक अडचणी वाढल्याने बिल्डरच अडचणीत आल्याने ते नवीन प्रकल्पासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
बांधकाम क्षेत्राला कोरोनाचा फटका, ३ महिन्यात एमएमआरमध्ये एकही नवीन घर नाही
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात दर महिन्याला नवनवीन गृहप्रकल्पाचा शुभारंभ होतो. हजारो घरे विक्रीसाठी येतात. पण कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसला आहे. इतिहासात कधी नव्हे ते पहिल्यांदा तीन महिन्यात एकही घर वा नवीन प्रकल्प एमएमआरमध्ये सुरू झालेला नाही.
एनरॉक या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या सर्वेक्षण कंपनीच्या अहवालानुसार कोरोना-लॉकडाऊनचा फटका नव्या प्रकल्पांना बसला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2020 या तीन महिन्यात 10 हजार 490 नवीन घरांचा शुभारंभ झाला आहे. एप्रिल, मे आणि जून 2020 या तीन महिन्यात मात्र एकही नवीन घर बाजारात विक्रीसाठी आलेले नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
2019 चा विचार करता पहिल्या सहा महिन्यात जानेवारी ते जून 2019 दरम्यान 28 हजार 100 नवीन घरांचा शुभारंभ झाला होता. जानेवारी ते जून 2020 मध्ये 10 हजार 490 घरे उपलब्ध झाली आहेत. म्हणजेच यंदा सहामाहीत 54 टक्क्यांनी घरे घटली आहेत.
लॉकडाऊनमध्ये कामबंद तर अनलॉकमध्ये मजूर नसल्याने काम बंद अशा दुहेरी संकटात एमएमआरमधील बिल्डर अडकले आहेत. त्यातच देशातील सर्वाधिक रूग्ण आणि कंटेंनमेंट झोन हे एमएमआरमध्येच आहेत. त्यामुळे काम सुरू करणे वा नवीन काम सुरू करणे ही बिल्डरांसाठी अवघड ठरत आहे. त्यामुळे आता सर्व बिल्डर आणि इच्छुक ग्राहक कोरोनाचा कहर संपण्याचीच वाट पाहत आहेत.