मुंबई-जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. अनेक कामधंदे बंद पडले आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने निर्माण झालेल्या संकटाचा फटका राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर बसला आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर आपले पोट भरणारे, ट्रकचालक-मालक, रिक्षाचालक, टॅक्सी, ट्रव्हल्स, टेम्पो चालक हतबल झाले आहेत. लाॅकडाऊनमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून उपासमारीची वेळ आली आहे.
वाहतुकीतून मिळणारी रोजंदारी बंद...
राज्यात वाहन चालवून पोट भरणारे लाखो लोक आहेत. मोठ्या शहरामध्ये हे प्रमाण अधिक आहे. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद याठिकाणी तर हा व्यवसाय मोठा चालतो. या मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त, व्यवसायासाठी, कार्यलयीन बैठकीसाठी येणारे खासगी वाहनातून प्रवास करतात. या प्रवासातूनच मिळणाऱ्या मिळकतीतून वाहनचालकांना रोजंदारी मिळते. त्यातून घर चालते. मात्र, देशात कोरोना महामारीचे मोठे संकट कोसळले.
21 दिवसांचा लाॅकडाऊन...
देशाच्या कानाकोपऱ्यातून कोरोनाच्या रुग्णांची संख्या समोर यायला लागली. त्यामळे खबरदीर म्हणून देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत होते. त्यामुळे 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. त्याचा आज 16 वा दिवस आहे. लाॅकडाऊन लागल्यामुळे सर्व कामधंदे बंद पडले. प्रवाशी वाहतुकही बंद करण्यात आली. त्यामुळे कॅबचालकांचे काम बंद पडले.
17 लाख वाहने मालवाहतूक व्यवसायात...
राज्यात मालवाहतूक व्यवसायात मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील चालक-काम करतात. मात्र, लॉकडाऊन नंतर बहुतांश ड्रायव्हर हे ग्रामीण भागातील आपल्या गावाकडे निघून गेले आहेत. वाहतुकदारांचे ट्रक, टेम्पो, कंटेनर एका जागी थांबून आहेत. महाराष्ट्रात एकंदरीत 17 लाख वाहने मालवाहतूक व्यवसायात आहेत. त्यावर काम करणारे चालक तसेच त्यांचे कुटुंबीय वाहन मालक ट्रान्सपोर्ट व्यवसायावर अवलंबून असलेले लहान-मोठे व्यावसायिक असे मिळून एक कोटी नागरिक या व्यवसायाशी संबंधित आहे. या सर्वांवरच कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे अशी माहिती वाहतूकदार संघटनेकडून देण्यात आली आहे.
राज्याच्या सीमेवर अनेक ट्रक, ट्रेलर, मालवाहतूक गाड्यांच्या रांगा..
वाहतूक व्यवसाय हा आधीच मंदीच्या चटक्या खाली आलेला असताना, त्यात कोरोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे या व्यवसायाचे कंबरडे मोडले , असल्याचे वाहतूकदार संघटना सांगतात. राज्याच्या सीमेवर अनेक ट्रक, ट्रेलर अडकून पडले आहेत. तिथे वाहनचालकांना दैनंदिन सुविधा देखील उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. किमान या वाहनचालकांना आपापल्या इच्छित स्थळी तरी जाऊ दिले जावे अशी वाहतूकदार संघटनेची मागणी आहे. राज्यात 85 टक्के वाहतूकदार हे एक किंवा त्यापेक्षा जास्त वाहन असलेले आहेत. मात्र, चालक उपलब्ध नसल्याने हे सर्व ट्रक सध्या सिमेवरच आहेत.
राज्याच्या सीमेवर अनेक ट्रक, ट्रेलरच्या रांगा... ...तर महागाई वाढण्याची शक्यता
वाहतूक व्यवसाय ठप्प झाल्याने 24 मार्च पासून देशात आणि राज्यात सर्व ठप्प असल्याने राज्यातील विविध मालांच्या साठवणीत असलेला माल संपत आलेला आहे. त्यामुळे येत्या काळात वाहतूक सुरळीत झाली नाही तर महागाई वाढण्याची शक्यताही वाहतूकदार संघटनांकडून व्यक्त केली जाते आहे. वाहतूक सुरुवात करायची असेल तर गावोगावी गेलेले ड्रायव्हर हे पुन्हा कामावर आले पाहिजेत. त्यासाठी वाहतूकदार संघटनांकडून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले असून गावोगावी गेलेल्या चालकांना त्यांच्या कामाच्या जागी येऊ दिले जावे अशी विनंती वाहतूक संघटनांनी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत माल वाहतूकदार संघटना आणि तिच्याशी संबंधित ड्रायव्हर वाहतूकदार आणि इतर अवलंबित व्यवसायांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
टॅक्सी चालकांचे आर्थिक गणित कोलमडले...
पिंपरी-चिंचवड शहरातही अनेक टॅक्सी चालकांची विदारक अवस्था झाली आहे. काम बंद झाल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत आहे. देशभरासह पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोलीस आहेत. अशा परिस्थिती टॅक्सी चालक अडचणीत आले आहेत. शहरातील यल्लेश शिवशरण हे टक्सी चालक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी कार घेतली. आता सर्व काही ठप्प असून आर्थिक मिळकत बंद झाली आहे. मोटारीचा थकलेला हप्ता भरायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
टॅक्सी चालकांचे आर्थिक गणित कोलमडले.. यल्लेश शिवशरण हे चार ते पाच वर्षांपासून टॅक्सी चालवतात. टॅक्सी चालवून त्यांना वेळच्यावेळी पैसे मिळायचे. हप्ते देखील सुरळीत जात होते. परंतु, कोरोना विषाणूने थैमान घातले आणि होत्याच नव्हते झाले. जगभरात अनेकांचा यामुळे मृत्यू झाला. त्याच दरम्यान मार्च महिन्यात कोरोनाने भारतात शिरकाव केला. केंद्र आणि राज्यशासन यांनी संचारबंदी आणि जमावबंदी लागू करत वाहनांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यानंतर 21 दिवसांचे लॉकडाऊन केल्याने याचा थेट परिणाम टॅक्सी चालकांवर झाला.
यल्लेश यांना दोन मुली असून घरात आई आणि पत्नी असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून टॅक्सी बसून असल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. वेळीच कोरोनाचे संकट दूर झाले नाही तर याचा मोठा फटका बसू शकतो, असे ही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, टॅक्सी चालकां प्रमाणे इतर व्यावसायिकांना देखील मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
ट्रक चालकांवर उपासमारीची वेळ...
लाॅकडाऊन लागल्यानंतर अनेक ट्रक चालक नागपुरातच अडकले. यातले काही जण हे सामान लोड करण्यासाठी नागपुरात आले होते. तर काहींनी याठिकाणी सामान आणले होते. सुरुवातीला माल वाहतुकीबद्दल प्रशासनाकडून स्पष्टता नसल्याने नागपुरातच राहिल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे नागपूरच्या बाहेरील रस्त्यांवर ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुळात ट्रक चालकांच्या जीवनात कायमची भटकंती असते. सतत प्रवास करुन पोटापाण्याची सोय करणे हेच त्यांचे काम आहे.
ट्रक चालकांवर उपासमारीची वेळ... महिन्यातून काहीच दिवस असे असतात की त्यांना आपापल्या घरी जायला मिळते. शेकडो किलोमिटरचा प्रवास त्यांच्यासाठी अगदी नित्याचा असतो. पण एका जागी थांबून रहाण्याची वेळ त्यांच्यावर क्वचितच येते. टाळेबंदीमुळे यंदा त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढत असल्याने जेवणासाठीचा त्यांचा संघर्ष वाढला आहे. सततच्या भटकंतीमुळे अन्न शिजवण्यासाठीचे आवश्यक सामान त्यांच्यासोबत आहे. मात्र धान्य, भाजीपाला व इंधनासाठी त्यांना भटकावे लागत आहे.
...कोरोनाचे संकट लवकरात जावे
मुंबई उपनगरात अडीच लाख रिक्षाचालक आहेत. लॉकडाऊन काही भागात वाढण्याची शक्यता आहे. आता, दिवस कसे काढायचे असे बोलायची वेळ रिक्षावाल्यांवर आली आहे. ऑटोरिक्षा मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी देखील रिक्षा चालकांना सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे.
रिक्षा चालकांचा धंदा बंद झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व धंदे ठप्प झाले. यात सर्वात जास्त हातावर पोट असणाऱ्या कामगारांना याचा फटका बसला. रिक्षा चालक दिवसभर रिक्षा चालवतो. कमावलेल्या पैशावर त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र, लाॅकडाऊनमुळे रिक्षा चालकांचा धंदा बंद झाला आहे. त्यामुळे देशावर आलेले कोरोनाचे संकट लवकरात जावे, अशी आशा रिक्षाचालक व्यक्त करत आहेत.
बाहेरील 700 ते 800 ट्रक शहरातच...
नाशिक शहरात महाराष्ट्रासह अन्य राज्यातून आलेले 400 ते 500 ट्रक लाॅकडाऊनमुळे इथेच आहे. काही दिवसांपूर्वी ट्रकचा हा आकडा 700 ते 800 इतका होता. गेल्या अनेक दिवसांपासून इथच असलेल्या ट्रक चालकांना नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून रोज जेवण दिले जात आहे.
700 ते 800 ट्रक शहरातच.... ट्रकचालकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांना 15 दिवस पुरेल एवढा किराणा देण्यात आला आहे. तांदूळ, डाळ, तेल, मसाले, साबण ह्याचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबापासून दूर असल्याने आता त्यांना भेटण्याची ओढ लागल्याच्या प्रतिक्रिया ट्रक चालकांनी दिल्या आहे. तसेच सरकारने देखील पुढाकार घेऊन ट्रक चालकांना मदत करावी, असे नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे म्हणणे आहे.
दुकानदारही उधार देत नाही... आमच्यावर अत्यंत बिकट परिस्थिती
मागील 18 दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने रिक्षा बंद आहे. खिशात पैसा नाही दुकानदार उधार देत नाही. अशा परिस्थितीत सहा ते सात जणांचे कुटुंब जगवायचे कसे? असा प्रश्न बीड शहरातील रिक्षा चालक शेख रज्जाक यांनी उपस्थित केला आहे. लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेली परिस्थिती बिकट आहे.
रिक्षा चालक शेख रज्जाक यांच्या कुटुंबात चार मुली, दोन मुले, पत्नी असे एकूण सात ते आठ जणांचे कुटुंब आहे. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शेख रज्जाक हे रिक्षा चालवून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिवसाचे पाच सहाशे रुपये मिळायचे. मात्र, आता तेही मिळत नाहीत. आमच्यावर अत्यंत बिकट परिस्थिती ओढावली आहे. यातून बाहेर कसं पडू याची चिंता आम्हाला सतावत असल्याचे रिक्षा चालक शेख रज्जाक म्हणाले.