मुंबई - शहरामध्ये कोरोना विषाणूचा विळखा वाढत असल्याने पालिका, रेल्वे व राज्य सरकार विविध पर्याय शोधत आहेत. अतिमहत्त्वाचे काम नसेल तर रेल्वेचा प्रवास करू नये अशी वारंवार उद्घोषणा रेल्वेकडून करण्यात येत आहे, याचा परिणाम प्रवाशांची संख्या कमी होण्यावर झाला आहे. सकाळपासून ते सायंकाळीही घाटकोपर रेल्वे स्थानकावर गर्दी कमी दिसून येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रभाव मुंबईत वाढला असून प्रत्येक मुंबईकर आता सतर्क झाला आहे. यातच शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. रोजच्या प्रमाणे काम नसेल तर मुंबईकर घराबाहेर न पडता घरीच बसणे सध्या पसंत करत आहेत. मध्य रेल्वेचे घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशांच्या गर्दीने कायम भरून असते. मात्र, विषाणूचा होत असलेला प्रसार पाहून लोकलला गर्दी नगण्य असून सायंकाळी, सकाळी फलाट क्रमांक 1 ते 4 वर प्रवाशी बोटावर मोजण्या इतके उपस्थित होते.