मुंबई- जगभरात कोरोनाचा प्रसार होत असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णापासून तसेच बाधित रुग्णाच्या मृतदेहांपासून विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. कोरोनाचे मृतदेह निर्जंतुकीकरण करुनच नातेवाईकांकडे दिले जातात. मृतदेह बॅगमध्ये बंद करताना तसेच त्यावर अंत्यसंकार करताना विशेष काळजी घेण्याच्या सूचना सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृतदेहाच्या निर्जंतुकीकरणासाठी राबवली 'ही' प्रक्रिया, द्रावणाची कमतरता नाही
कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या मृतदेहामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. हा संसर्ग रोखण्यासाठी मृतदेहांचे निर्जंतुकीकरण केले जाते. यासाठी मृतदेहावर एक टक्के हायपोक्लोराईट असलेले मिश्रण फवारले जाते. हे मिश्रण फवारल्यानंतर तो मृतदेह बॅगमध्ये बंदिस्त केला जातो आणि शवागृहात ठेवला जातो. मृतदेहांवर अंत्यसंस्कार रुग्णालयाचे आणि स्मशानभूमीतील कर्मचारी करतात.
2019 च्या शेवटी चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. २०२० मध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण जगभरात आढळून येऊ लागले. कोरोना विषाणूची लागण एखाद्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने होते. त्यासाठी मास्क, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीत जाऊ नये, हात सतत स्वच्छ करणे, खोकताना शिंकताना रुमालाचा वापर करणे आदी सूचना सरकार आणि महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्यू झाला असल्यास त्याला निर्जंतुकीकरण करून तो मृतदेह मृतदेहांच्या बॅगमध्ये ठेवूनच शवागृहात ठेवावा किंवा अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात येतो, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या रुग्णालयाचे संचालक रमेश भारमल यांनी सांगितले.
मृतदेह हाताळताना किंवा रुग्णांच्या जवळ जाताना पीपीई किट घालणे, मास्क, ग्लोव्हजचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक मृतदेह निर्जंतुकीकरण करुन बॅगमध्ये बंद करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ५०० रुपये दिले जात असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली. निर्जंतुकीकरणासाठी लागणाऱ्या हायप्लोक्लोराईटचा साठा पालिकेकडे मुबलक प्रमाणात असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
...असे केले जाते मृतदेहाचे निर्जंतुकीकरण -
कोरोना विषाणूच्या रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात. विशेष करुन आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर असलेल्या किंवा गंभीर परिस्थितीत असलेला रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू होतो. मृतदेहांपासून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती असल्याने त्या मृतदेहावर एक टक्के हायपोक्लोराईट असलेले मिश्रण फवारुन निर्जंतुकीकरण केले जाते. औषध फवारणीनंतर सदर मृतदेह मृतदेहासाठी वापरल्या जाणाऱ्या बॅगमध्ये बंदिस्त केला जातो. त्यानंतर मृतदेह शवागृहात ठेवला जातो. नातेवाईक आल्यावर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला जात असला तरी मृतदेहांवर रुग्णालयाचे आणि स्मशानभूमीतील कर्मचारीच अंत्यसंस्कार करतात. मृतदेह लहान मुलांचा, सडपातळ व्यक्तीचा किंवा धष्टपुष्ट व्यक्तीचा आहे, त्याप्रमाणे औषधांची फवारणी केली जाते.
रुग्णालायत निर्जंतुकीकरण -
रुग्णालयातील जमीन, बेड, रेलिंग, साईड टेबल, आयव्ही स्टॅण्ड आदी सर्व वस्तूवर 1 टक्के सोडियम हायप्लोक्लोराईट असलेले मिश्रण फवारून परिसर निर्जंतुकीकरण केले जाते. 30 मिनिटे हा परिसर व वस्तूवर फवारणी केलेले मिश्रण सुकवले जाते. त्यानंतर तो परिसर, रुग्णालयतातील बेड व इतर वस्तू पुन्हा वापरात आणल्या जातात.
असे बनवले जाते फवारणीचे मिश्रण -
हायप्लोक्लोराईट या केमिकलचे पाच लिटरचे कॅन मिळते. हे हायप्लोक्लोराईट फवारणीसाठी असलेल्या यंत्रात किंवा पंपामध्ये पाण्यात मिसळले जाते. परिसर निर्जंतुकीरण करण्यासाठी पाण्याच्या प्रमाणात 1 टक्के किंवा मृतदेहांच्या निर्जंतुकीकरणासाठी 1 ते 10 टक्के हायप्लोक्लोराईटचा वापर केला जातो. साधारणत: एका मृतदेहाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 1 ते दोन लिटर सोडीयम हायप्लोक्लोराईटचा वापर होतो. हे प्रमाण मृदतेहाचा आकार आणि वजनानुसार ठरते. मुंबईत कोरोनामुळे दररोज सरासरी 50 जणांचा मृत्यू होतोय. त्यानुसार दररोज 75 ते 100 लिटर द्रावण लागते. मुंबईत 22 ऑगस्टपर्यंत 7385 जणांचा मृत्यू झााला आहे. त्यासाठी साधारणत: 4500 लिटर द्रावण वापरण्यात आले आहे. सोडीयम हायप्लोक्लोराईटचा पुरेसा साठा असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.