कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या पुण्यात बैठक घेणार
पुणे जिल्ह्यातही सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. यासंदर्भात अजित पवार संबंधित अधिकारी, महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करत असून शुक्रवारी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीतून रुग्णसंख्या वर कशा प्रकारे आळा घालता येईल यासंबंधी विचार विनिमय केले जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
मुंबई -सध्या राज्यात कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने, यासंदर्भात राज्य सरकार गंभीर असून लोकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील जनतेला कोरोनाचे नियम पाळलेच पाहिजेत असे अहवाल केले होते. मात्र, तरीही आज राज्यात परिस्थिती बिकट होताना दिसतेय. सध्या लॉकडाऊन संदर्भात मंत्रिमंडळात मतमतांतरे आहेत. पण ज्याप्रकारे राज्यभरात रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय त्यामुळे राज्यभरात कडक निर्बंध लादले गेले पाहिजेत, यासाठी सर्वांच एकमत असल्याचे अजित पवार यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.