मुंबई - कोरोनाने राज्यासह देशात पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याची गरज आहे. देशभरात कोरोनासह इन्फ्लुएंझा आजाराच्या एच १ एन १, एच ३ एन २ या व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. विशेषकरून एच ३ एन २ चे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही मृत्यू झाल्याने देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मुंबईमध्ये जानेवारी ते २७ मार्च या कालावधीत एच ३ एन २ या व्हेरियंटचे २९ रुग्ण आढळून आले आहेत. या एकूण रुग्णांचा विचार करता ९ जण दवाखान्यातच उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली.
एच ३ एन २ चे २९ रुग्ण - मुंबईत एच १ एन १ चे जानेवारी महिन्यात १८, फेब्रुवारीत ३९ तर मार्चमध्ये ५५ असे एकूण ११२ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच एच ३ एन २ चे जानेवारीत १, फेब्रुवारीत ७ तर मार्चमध्ये २१ असे २९ रुग्ण आढळून आले आहेत. एच १ एन १ व एच ३ एन २ चे एकूण १४१ रुग्ण आढळून आले आहेत. एच १ एन १ चे ५ तर एच ३ एन २ चे ९ असे एकूण १४ रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या ए वॉर्ड म्हणजे फोर्ट कुलाबा, डी वॉर्ड म्हणजे मलबार हिल, एफ साऊथ म्हणजे परळ लालबाग तसेच जी साऊथ म्हणजेच प्रभादेवी वरळी या विभागात इन्फ्लुएंझा आजाराचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. यावर्षी इन्फ्लुएंझामुळे गेल्या तीन महिन्यात एकही मृत्यू झालेला नाही अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
मुंबई महापालिका सज्ज -सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मुंबईत इन्फ्लूएंझा नियंत्रणासाठी ओसेल्टामिवीर (Oseltamivir) मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महापालिका रुग्णालये, दवाखाने आणि प्रसूती गृहे यामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी Oseltamivir चा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बफर स्टॉक सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. आरोग्य पोस्ट कर्मचार्यांना तापाच्या रूग्णांची ओळख पटविण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून परिसरात आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात यावेत. चाचण्यांच्या निकालांची वाट न पाहता Oseltamivir ताबडतोब सुरू करावेत अशा मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने जारी केल्या आहेत.