मुंबई - राज्यात आज तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. यातील एक रुग्ण(वय ३३) पुणे येथील त्याने अमेरिकेला प्रवास केला आहे. दुसरा रुग्ण(वय ३५) हा ठाण्यातील रहिवासी असून फ्रान्सवरून आला आहे. सध्या त्याच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, तिसरा रुग्ण(वय ६४) हा दुबईवरून आलेला असून हिंदूजा येथे भरती आहे. या तिघांचेही रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.
मुंबईतील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना विषाणुची बाधा झाली असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत क्रिटिकल स्टेजमध्ये असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. या सर्व करोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असल्याचे ते म्हणाले.
आज राज्यात एकूण ५० नवीन संशयित भरती झाले आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत १२९५ विमानांमधील १ लाख ४८ हजार ७०६ प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार सर्व देशाहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील ३ विमानतळांवर करण्यात येत आहे. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. 'ब्युरो ऑफ इमिग्रेशन'द्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या ३ देशात सध्या कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने २१ फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.