मुंबई- कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाला लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशात लॉकडाऊन घोषित केले होते. नागरिकांनी घरीच रहावे, असे त्यामागचे उद्देश्य होते. यामुळे थोडे का होईन कोरोनाचे संक्रमण कमी होण्यात यश येत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसायाला खीळ लागल्याचे दिसून आले आहे. औरंगाबाद आणि कोल्हापूर जिल्ह्यात वाहन दुरुस्ती व्यवसायाला कोरोनाची नजर लागली आहे. कामगार बेरोजगार झाले असून त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील दुचाकी आणि चारचाकी दुरुस्त करणारे सर्व मेकॅनिक बेरोजगार झाले आहेत. लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने वाहन दुरुस्ती कामगारांना पगार देणे अवघड झाले आहे. त्यामुळे, कामगारांपुढे जगावे कसे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच, लॉकडाऊन संपल्यावर देखील लवकर काम सुरू होणार नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे, आपल्यावर उपासमारीची वेळ तर येणार नाही ना, ही चिंता कामगारांना सतावत आहे.
तसेच, लॉकडाऊन दरम्यान अनेक वाहने अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करत आहे. प्रवासा दरम्यान ही वाहने तांत्रिक बिघाड होऊन बंद पडल्यास त्यांची दुरुस्ती कशी होणार, हा देखील प्रश्न आहे. या वाहनांमध्ये बिघाड झाल्यास अत्यावश्यक वस्तू पुरवाठा खंडीत होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, संचारबंदी असल्याने अनेकांची वाहने घरीच पडून आहेत. ही वाहने बऱ्याच दिवसापासून घरीच असल्याने त्यामध्ये बिघाड होण्याची शक्यता नकारता येत नाही, असे मत एका मोटार दुरुस्ती कामगाराने व्यक्त केले आहे.
कोल्हापुरातील ३ हजार वाहन दुरुस्ती अस्थापनांना कोरोनाचा फटका
जिल्ह्यात वाहन दुरुस्ती दुकांनांची संख्या हजाराच्या घरात आहे. एकट्या कोल्हापूर शहरात ३ हजार वाहन दुरुस्ती दुकाने आहेत. या दुकानांना लॉकडाऊमुळे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्व मालवाहतूकदारांना याचा फटका बसत आहे. जिल्ह्यातील जवळपास दीड हजार ट्रक अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. पण, वाहनामध्ये अचानक बिघाड आल्यास चालकांना मेकॅनिक शोधण्यात वेळ घालवावा लागत असल्याची माहिती लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षांकडून मिळाली आहे. त्यामुळे, मेकॅनिक नसल्याचा फटका फक्त घरगुती वाहनांनाच बसत नसून अत्यावश्यक सेवेसाठी रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांना देखील बसत असल्याचे दिसून आले आहे.