महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटाची नाराजी, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा देताच शिंदे सरकारने तात्काळ मंत्री पदे दिली. शिंदे गटाचे आमदार यामुळे नाराज झाले आहेत. आम्ही अजून किती दिवस वाट पहायची? असा सवाल कोअर कमिटीच्या बैठकीत केला. दरम्यान, उपस्थितांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे यासंदर्भात आमदारांनी नाराजी व्यक्त करताच, त्यांनी नागपूरचा दौरा अर्धवट सोडून त्यांनी तातडीने मुंबई गाठली. तसेच आज कोअर कमिटीची बैठक घेऊन, तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jul 5, 2023, 9:40 AM IST

Updated : Jul 5, 2023, 11:57 AM IST

मुंबई :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवली, त्यांच्यासोबत सत्तेत बसणार नाही, असा पवित्रा घेत शिंदे गटाच्या 40 आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप करण्यात आला. वर्षभरातच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना घेऊन राज्यात सत्तेत सामील झाले. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला शिंदे सरकारसोबत आणल्याने शिंदे गट तोंडावर पडला आहे. एवढेच नव्हे तर 9 जणांना मंत्रीपदे देण्यात आली. शिंदे गटाचे आमदार यामुळे प्रचंड नाराज आहेत. शिवाय, सर्वसामान्य जनतेत बदनामी होऊ लागली आहे. शिंदे गट त्यामुळे चांगलाच आक्रमक झाला आहे.

शिवसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत सहभागी झाल्याने प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राजकारणात आमचा प्रतिस्पर्धी गट सत्तेत सहभागी झाला आहे. ते भाजपने केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आमच्यात सामील झाल्यानंतर शिंदे गटातील लोक नाराज झाले आहेत. कारण आमच्या नेत्यांना हवे ते स्थान मिळणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्याने आमचे नेते नाराज आहेत. याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना कळवले आहे. त्यांना हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. आता एकनाथ शिंदे कृतीचा निर्णय घेणार आहेत. आम्ही नेहमीच राष्ट्रवादीच्या विरोधात होतो आणि आजही विरोधात आहोत. आम्ही शरद पवारांच्या विरोधात आहोत. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) सरकार चालवत होते, असा आरोप शिरसाट यांनी केला आहे.



शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी : राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक संपल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांसोबत नाराजी बोलून दाखवली. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु येणार असल्याने मुख्यमंत्री नागपूरला रवाना झाले होते. नाराज आमदारांनी शिंदे गटाच्या कोअर कमिटीकडे तक्रार करताच, रात्री उशिरा मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक बंगल्यावरती बैठक घेण्यात आली. मंत्री शंभूराजे देसाई, आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, खासदार भावना गवळी, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आमदारांनी शिवसेनेत केलेल्या बंडापासून उद्धव ठाकरे यांना दिलेल्या त्रासाबाबत खंत व्यक्त केली.

भाजप गेम करत असल्याचा आरोप : राष्ट्रवादीला सोबत घ्यायची होती तर भाजपने शिवसेनेत का फूट पाडली, असा सवाल ही यावेळी उपस्थित करण्यात आला. आमच्या वाट्याची मंत्रीपदे राष्ट्रवादीला देऊन भाजप आमचा गेम करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला. आमदार भरत गोगावले, संजय शिरसाट आणि मंत्री शंभूराज देसाई यावेळी आक्रमक झाले होते. अखेर मुख्यमंत्र्यांकडे हा न्यायनिवाडा करण्याचे ठरविण्यात आले आहे.



मुख्यमंत्र्यांचा नागपूर दौरा अर्धवट :राष्ट्रपती नागपूर येणार असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा दौरा नियोजित करण्यात आला होता. सायंकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नागपूरला रवाना झाले. मात्र शिंदे गटांच्या आमदारांमध्ये धुसफूस वाढल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावरून दौरा अर्धवट सोडत तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. नाराज आमदारांची मनधरणीचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून होत आहे. आज कोअर कमिटीची बैठक देखील बोलावल्याचे समजते.

हेही वाचा :

  1. CM DCM Delhi Visit : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीत अमित शाह यांची घेतली भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा; महिना ठरला
  2. Maharashtra Political Crisis : शरद पवारांनी बोलावली बैठक, राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी; अजित पवारांनीही बैठकीसाठी पाठवली नोटीस
  3. Maharashtra Political Crisis : शरद पवार भेटीत काय बोलले? अमोल कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय केला रद्द
Last Updated : Jul 5, 2023, 11:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details