मुंबई- बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची ( Bureau of Narcotics Control ) मागणी मुंबई सत्र न्यायालयाने मंजुर केली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केलेल्या अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयाने निकाल एनसीबीला या प्रकरणात 60 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याचे मंजुरी दिली आहे.
आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात ( Cordelia Cruise Drugs Party ) प्रमुख आरोपी आहे. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांनी बुधवारी दोन तासांहून अधिक काळ पक्षकारांची युक्तीवाद ऐकून घेतला. निकाल राखून ठेवला होता, एनसीबीने या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्याकरता 90 दिवसांचा वेळ आणखी मागितला होता. न्यायालयाने निकाल देत 60 दिवसांचा वेळ वाढवून दिला आहे.
असा झाला युक्तीवाद-विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना यांनी युक्तिवाद केला, की आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून देण्याच्या अर्जामध्ये सक्तीची कारणे होती. सेठना यांनी युक्तिवाद केला की अर्ज 180 दिवसांच्या कालावधीत दाखल केला गेला आहे. जो आरोपपत्र दाखल करण्याचा कालावधी आहे. जरी कालावधी संपल्यानंतर अर्जावर निर्णय घेतला गेला तरी, तो आरोपीला जामीन देण्यास पात्र होणार नाही. सेठना यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की 15 प्रमुख संशयितांचे जबाब बाकी आहेत. काही आरोपी एकमेकांशी जोडलेले असल्याने त्यांचा तपास सुरू आहे. तर या प्रकरणात कोठडीत असलेल्या दोन आरोपींपैकी एक अब्दुल कादर शेख यांचे वकील कुशल मोर यांनी हा अर्ज म्हणजे आरोपींना तुरुंगात ठेवण्याचा डाव असल्याचा युक्तीवाद केला होता.
नेमके प्रकरण काय?मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खानला हा 27 दिवस तुरुंगामध्ये राहावे लागले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचेदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानची जामीन फेटाळून लावली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला होता.