मुंबई -कोरोना लढ्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्याला आता देशात सुरुवात होत आहे. 16 जानेवारीपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार असून कोरोनामुक्तीच्या दिशेने टाकलेल हे पहिले पाऊल असणार आहे. अशावेळी हे पहिले पाऊल टाकण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, सिरम इन्स्टिट्यूट आणि लसीचे प्रत्यक्ष वितरण देशातील प्रत्येक डेपो (कोल्ड स्टोरेज डेपो)पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असणारी 'कुल एक्स कोल्ड चैन' कंपनीही सज्ज झाली आहे. त्यानुसार कोणत्याही क्षणी सिरमकडून आदेश आल्याबरोबर मुंबई, गुजरातसह अन्य राज्यात लसीचे वितरण करण्यासाठी आम्ही पूर्णतः तयार आहोत, अशी माहिती 'कुल एक्स कोल्ड चैन' कंपनीचे सहसंस्थापक राहुल अगरवाल यांनी खास 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
'देशभरात लसीचे वितरण करण्यासाठी आम्ही 300 कोल्ड ट्रक सज्ज ठेवल्या आहेत. रस्ते मार्गे आणि विमानाने लस पोहचवली जाणार असून त्या-त्या डेपोपर्यंत आम्ही ट्रकद्वारे लस पोहचवणार आहोत', असेही अगरवाल यांनी सांगितले.
तीन कंपन्यांवर लस वितरणाची जबाबदारी -
देशात एकाच वेळी मोठ्या संख्येने लसीकरण मोहीम राबवण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे लसीचे वितरण आणि लसीची साठवणूक योग्य प्रकारे करण्याचे आव्हान सिरम समोर आहे. हे आव्हान पेलत सिरमने तीन कंपन्यांवर लस वितरणाची जबाबदारी टाकली आहे. यात सर्वात आघाडीवर कुल एक्स कोल्ड चैन ही मुंबईस्थित कंपनी आहे. हीच कंपनी मुंबईला लस पोहोचवणार आहे. तर, देशातील अनेक राज्यातील डेपोपर्यंत लस पोहोचण्याची जबाबदारीही या कंपनीवर आहे. या कंपनीबरोबर इतर दोन कंपन्याही या प्रक्रियेत असणार आहेत, असेही अगरवाल यांनी सांगितले.