महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठी भाषा विभागाकडून 'दलित' शब्द होणार हद्दपार; साहित्यिकांमध्ये मतभेद

६० च्या दशकात जन्माला आलेल्या मराठी साहित्यातून 'दलित' शब्द हद्दपार होणार आहे. याबाबत राज्यातील दलित साहित्यिकांमध्ये उलटसुटल मतप्रवाह निर्माण झाले आहेत. मराठी भाषा विभागाने आपल्या सर्व व्यवहारातून 'दलित' हा शब्द काढण्यासाठीची कार्यवाही सुरू केली असल्याने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

By

Published : Dec 13, 2019, 10:24 AM IST

'दलित' शब्द हद्दपार
'दलित' शब्द हद्दपार

मुंबई -फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांच्या क्रांतीकारी विचारांना प्रमाण मानून ६० च्या दशकात जन्माला आलेल्या मराठी साहित्यातून 'दलित' शब्द हद्दपार होणार आहे. याबाबत राज्यातील दलित साहित्यिकांमध्ये उलटसुटल मतप्रवाह निर्माण झाले आहेत. मराठी भाषा विभागाने आपल्या सर्व व्यवहारातून 'दलित' हा शब्द काढण्यासाठीची कार्यवाही सुरू केली असल्याने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. साहित्यातून 'दलित' शब्द हद्दपार होणार आहे, यावर ज्येष्ठ‍ साहित्यिक ज. वि. पवार, 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी भाषा विभागाकडून 'दलित' शब्द हद्दपार


दलित हा शब्द शासकीय नाही. शासनाला हा शब्द मान्य नाही. कोर्ट-कचेऱ्यांमध्ये सुध्दा या शब्दावर खूप चर्चा झालेली आहे. १९३५च्या न्यू कन्वे नेटिव्ह अॅक्टमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचीत जमातीसाठी 'दलित' हा शब्द वापरला गेला होता. त्यानंतर बाबासाहेबांच्या आधीपासून दलित हा शब्द वापरला गेला. 1960 च्या नंतर मोठ्या प्रमाणात दलित साहित्य निर्माण झाले. त्याला दलित साहित्य म्हणूनच सर्वत्र मान्यता आणि प्रसिद्धी मिळाली. हे साहित्य जगभर पसरलेले आहे. त्यामुळे या दलित साहित्याला आणि शब्दाला नाकारून चालणार नाही. पर्यायी शब्द म्हणून आंबेडकरवादी साहित्य असे काही लेखक म्हणतात. त्यामुळे जर पर्याय द्यायचा असेल तर आंबेडकरवादी साहित्य असा शब्द द्यावा, असे मत ज.वि. पवार यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी

देशामध्ये महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली. त्यानंतर दलित शब्दाला महत्त्व आले. दलित हा शब्द नव ब्राह्मणवाद्यांच्या विरोधात हा एक क्रांतिकारी म्हणून तयार केलेला आहे. या शब्दाला जगभर मान्यता मिळालेली आहे. मात्र, काही ब्राह्मणवादी लोकांना या शब्दाचा पोटशूळ उठला असल्याने त्यांना तो आवडला नाही. खरंतर दलित साहित्यिकांनी या देशातील संपूर्ण व्यवस्थाच बदलती केली. स्वतःचे एक अस्तित्व आणि अस्मिता या साहित्यातून निर्माण केली.


भारतातील सर्वच भाषेमध्ये दलित लोक लिहीत आहेत. त्यांना मान्यता मिळत आहे. काही लोकांना हे आवडत नाही. म्हणून दलित या शब्दाबद्दल प्रचंड द्वेष तयार झालेला आहे. दलित साहित्य आणि हा शब्द तसाच पुढे चालला तर त्यातून या देशातील ब्राह्मणी व्यवस्था नष्ट होईल अशी भीती काहींना वाटते. त्यामुळे जोपर्यंत ब्राम्हणवादी व्यवस्था आहे तोपर्यंत दलित साहित्य हे कायमच राहणार असल्याचे लक्ष्मण गायकवाड म्हणाले.


भारतातील लाखो दलित साहित्यिक आणि चळवळीतील अग्रणी लोक रस्त्यावर उतरतील. दलित साहित्य आणि दलित शब्दाच्या संदर्भात अस्तित्वाची लढाई लढतील, असा इशाराही गायवाड यांनी दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी डीप्रेस हा शब्द वापरला होता, त्याला पुढे दलित म्हटले जाऊ लागले. बाबासाहेब हा शब्द वेळोवेळी वापरत म्हणून हा शब्द सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा बनला. आज हा शब्द शक्तीचा आणि अस्मितेचा बनला आहे, त्यामुळे तो साहित्यातून काढला जाऊ नये, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांनी केली.


मराठी भाषा विभागाने आपल्या कामकाजातून 'दलित' शब्द काढण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीत या विभागाकडून देण्यात येणाऱ्या 'दलित साहित्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कारा'चे नाव बदलून 'उपेक्षितांचे साहित्य (शोषीत, पीडीत, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती, नव बौद्ध) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार' असे केले आहे. येत्या काही दिवसांत या विभागाकडून अशा प्रकारचे अनेक बदल केले जाणार असल्याने त्याविरोधात काही साहित्यिक रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details