मुंबई - सीएसटीएम येथील हिमालय पूल दुर्घटनेत दोषी ठरलेल्या डी. डी. देसाईज् असोसिएटेड या कंपनीला पुन्हा काम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मुंबईमधील कुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा आदी विभागातील १६ पुलांच्या दुरुस्तीसाठी देसाईला तब्बल १६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. पालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळेपुन्हा वाद निर्माण होणार आहे.
१४ मार्चला हिमालय पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मुंबईतील सर्वच पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. ‘हिमालय’ पूल कोसळून झालेली दुर्घटना ‘बनावट’ स्ट्रक्चरल ऑडिटमुळेच घडली असून यात ६ जणांना नाहक जीव गमवावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर दोषी कंपनीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भक्कम पुराव्याच्या आधारे कंपनीचा ऑडिटर निरजकुमार देसाई याला दोषी ठरवून पोलिसांनी अटक केली आहे.
चुकीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमुळे हिमालय पूल दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर मुंबईतील सर्वच पुलांचे पुन्हा ऑडिट करण्याचा निर्णयप्रशासनाने घेतला आहे.हिमालय पूल दुर्घटना प्रकरणी दोषी ठरलेल्या देसाईज असोसिएटेड कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले आणि पॅनलवरुन हकालपट्टी करण्यात आले आहे. असे असताना पालिकेने ए, बी, सी, डी आणि ई विभागातील पुलांची आणि भुयारी मार्गाची किरकोळ दुरुस्तीसाठी डी. डी. देसाईचा सल्ला घेतला आहे. या पार्श्वभूमीवरकुलाबा, ग्रॅन्टरोड, चंदनवाडी, भायखळा या वर्दळीच्या भागातील १६ पुलांची दुरुस्ती केली जाणार असून त्यासाठी १३ कोटी ८६ लाख, ४० हजार ८९ रुपये खर्च केले जाणार आहेत.