मुंबई :कोरोनाची तीव्रता कमी होऊ लागल्याने 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली. मात्र, आता मर्यादा पाळत नसल्याचे चित्र लोकल प्रवासात दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाची सुद्धा गर्दी नियंत्रण करताना दमछाक होत आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. लोकलमधील गर्दी नियंत्रणात आली नाही तर मुंबईच्या जीवनवाहिनीचे दार पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होण्याची शक्यात आहे.
लोकलमध्ये नियम पायदळी
मुंबईसह राज्यभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून नाईट कर्फ्यू लावला आहे. कोरोना सबंधित नियमांचे लोकल प्रवासात पूर्णतः तीन तेरा वाजले आहेत. लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहेत. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेची मर्यादा घालून लोकलचे दार उघडले. मात्र, वेळेची मर्यादा प्रवाशांकडून पाळली नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
वेळेचे बंधन पाळणे गरजेचे
शासनाकडून सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची अट घातली आहे. तसेच, या वेळेव्यतिरिक्त सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवास केल्यास किंवा वेळेचं बंधन न पाळल्यास विना तिकीट प्रवास केल्याचा दंड आकारला जात होते. मात्र, हे वेळेचं बंधन पाळले जात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.