मुंबई -कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे. तसेच या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील कोरोना संदर्भात अपडेट आणि माहिती उपलब्ध होणार आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्य सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा त्यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.