महेश तपासे यांची प्रतिक्रिया मुंबई :राज्यातील सत्ता संघर्षावर येत्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णय येण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुट्टीवर जाण्याने या सर्व प्रकाराला मोठ्या प्रमाणात हवा मिळाली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याची पोस्टरबाजी सुरू केली आहे तर काही मंत्र्यांनी सुद्धा आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
अजित पवार मुख्यमंत्री? :राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असून ते काही आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याच्या वावड्यांनी गेला आठवडाभर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार आणि अजित पवार यांच्यासारखा धडाडीचा नेता नाही असे भाजपमधूनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटल्याने त्या संदर्भात चर्चाला अधिक उत आला. अजित पवार यांच्या मागे असलेला ईडी चा सासेमिरा, शरद पवार यांनी आपल्या काही नेत्यांवर दबाव असल्याचे केलेले जाहीर विधान आणि मुख्यमंत्री पदाची अजित पवार यांची इच्छा या सर्व बाबी पाहता कार्यकर्त्यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा आशयाची पोस्टरबाजी ठाणे उल्हासनगर धाराशिव या ठिकाणी केल्याचे पाहायला मिळाले मात्र स्वतः अजित पवार यांनी यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
जयंत पाटील मुख्यमंत्री? :राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि जनतेतील नेतृत्व असल्यामुळे जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचे त्यांच्याच पक्षातील खासदार अमोल कोल्हे यांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे जयंत पाटील सुद्धा आपसूक या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ओढले गेले आहेत. जयंत पाटील यांची मुख्यमंत्री पदासाठी असलेली क्षमता आणि इच्छाही यापूर्वी लपून राहिलेली नाही.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री? :राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्या समीकरणांमध्ये मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास किंवा काही घटना घडल्यास शिंदे यांना पायउतार व्हावे लागण्याची शक्यता आहे अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष अपक्ष आमदारांच्या सहाय्याने सत्ता अबाधित राखण्यात यशस्वी होऊ शकते त्यावेळी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते आणि नेते व्यक्त करीत आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री? :काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि राज्याचे सध्याचे महसूल मंत्री भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सध्या राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पद विखे पाटील यांच्याकडे आहे विखे पाटील हे मराठा समाजाचे नेते मानले जातात. त्यामुळे मराठा समाजाचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे त्याशिवाय शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतेच विधान केले आहे की मुख्यमंत्री पदासाठी राधाकृष्ण विखे पाटील योग्य व्यक्ती असून जर अनुप्रयोग हनुमानाप्रमाणे छाती फाडून दाखवता आले असते तर माझा हृदयात विखे पाटीलच दिसले असते. त्यांच्या या विधानाने राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली असून विखे पाटील यांचा सहकारावरील प्रभाव आणि राज्यातील वजन पाहता त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे मात्र जर असे झाले तर भारतीय जनता पक्षात बाहेरून आलेल्या व्यक्तीलाच अधिक महत्त्व मिळते आणि पॅराशुट लँडिंग केलेल्या नेत्यांनाच महत्त्व आहे निष्ठावान कार्यकर्ते आणि नेत्यांना डावलले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
शिंदेच राहणार मुख्यमंत्री? :दरम्यान राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि आगामी निवडणुका या शिंदे आणि फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील असा दावा शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते यांच्याकडून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात कोणतीही विपरीत गोष्ट होणार नाही कारण आम्ही कायद्यानुसारच वागत आलो आहोत त्यामुळे सरकारला कोणताही धोका नाही आणि मुख्यमंत्रीपदालाही कोणताही धोका नसल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील अशीही जोरदार चर्चा सुरू आहे एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये अद्याप काहीही निर्णयापर्यंत आले नसताना अचानक मुख्यमंत्री पदाची स्पर्धा सुरू झाली असून पाच महत्त्वाच्या नेत्यांच्या नावाभोवती ही चर्चा फिरताना दिसत आहे.
हेही वाचा - Barsu Refinery Row : बारसू रिफायनरी आंदोलन चिघळले; पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज, आंदोलन तीन दिवसांसाठी स्थगित