मुंबई- शहर आणि मुंबई महानगर परदेशातील (एमएमआर) वाहतूक व्यवस्था मजबूत करत येथे अत्याधुनिक वाहतूक सेवेचे जाळे विणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातूनच एमएमआरमध्ये कोस्टल रोड, सागरी सेतू, मल्टीमॉडेल कॉरिडॉर, उड्डाण पूल असे विविध वाहतूक सेवा प्रकल्प सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यास ते एकमेकांशी जोडले जाणार आहेत. तर हे सर्व प्रकल्प 2030 पर्यंत पूर्ण होणार आहेत. एकुणच 2030 पर्यंत एमएमआरमध्ये रिंगरूट तयार होणार असून यामुळे मुंबईकर-नवी मुंबईकरांचा प्रवास 'सुपर-सुपर फास्ट' होणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडी) चे अतिरिक्त महानगर आयुक्त के एच गोविंद राज यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त के एच गोविंद राज यांच्याशी बातचीत.. जगातील सर्वांत मोठा सागरी सेतू -
मुंबई-नवी मुंबई शहर जवळ आणण्यासाठी 22 किमीचा सागरी सेतू प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. तर हा शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू जगातील सर्वांत मोठा सागरी सेतू असल्याचा दावा गोविंद राज यांनी केला आहे. ब्रम्हपुत्रा नदीवरील पूल साडे नऊ किमी लांबीचा आहे. तर शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू प्रकल्पातील मूळ सागरी पूल साडे सतरा किमीचा आहे. तसेच या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारे स्टील हे पॅरिसमधील आयफेल टॉवरसाठी वापरण्यात आलेल्या स्टीलच्या चार पट आहे. सागरी सेतूच्या कामासाठी जे बारजेस स्पॅन तयार करण्यात आले आहेत त्याचे एकूण क्षेत्रफळ हे वानखेडे स्टेडियम इतके आहे. तेव्हा या प्रकल्प अनेकार्थाने वैशिष्ट्यपूर्ण असल्याचेही गोविंद राज यांनी सांगितले आहे.
24 महिन्यात कामाने घेतला वेग -
सागरी सेतू प्रकल्प हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे हा प्रकल्प कुठेही रखडणार नाही, याची पूर्ण काळजी घेत प्रकल्प राबविला जात आहे. शक्य तितक्या लवकर प्रकल्प पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. त्यामुळेच हा प्रकल्प 54 महिन्यात पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्यानुसार 24 महिन्यात काम वेगात सुरू ठेवत 35 ते 50 टक्के काम पूर्ण केल्याचे गोविंद राज यांनी सांगितले आहे. त्यामुळेच कोविड काळात ही या प्रकल्पावर कुठेही परीणाम होऊ देण्यात आला नाही. अगदी व्हिएतनाम-कोरियावरून जे स्टील स्पॅन येणार होते ते ही वेळेत आणण्यात आले आहेत असेही ते म्हणाले. तर यातून मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती ही होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पर्यावरणाचा समतोल राखतच प्रकल्पाचे काम -
कोणताही पायाभूत सुविधा प्रकल्प जाहीर झाला की त्याला पर्यावरणाच्या मुद्दयावर विरोध होतोच. असाच विरोध सागरी सेतू प्रकल्पात ही झाला. तीवरांची-झाडांची कत्तल असो वा फ्लेमिंगोच्या वास्तव्यास लागणारा धक्का असो या सर्व मुद्द्यांवर या प्रकल्पाला ही मोठा विरोध होताना दिसतो. पण प्रत्यक्षात मात्र हा प्रकल्प राबवताना पर्यावरणाला कुठेही धक्का बसणार नाही, फ्लेमिंगोवर काहीही परिणाम होणार नाही याची बारकाईने काळजी प्रकल्पाच्या सुरुवातीपासून घेण्यात आली आहे. त्यामुळेच या कामासाठी जितकी झाडे-तीवरे कापावी लागणार होती त्याच्या केवळ 50 टक्केच झाडे-तिवरे कापण्यात आली आहेत. शक्य तितकी झाडे-तीवरे वाचवण्यात आल्याचेही गोविंद राज यांनी सांगितले आहे. तर फ्लेमिंगोची संख्या कमी होऊ नये, यासाठी ही प्रकल्पात आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे फ्लेमिंगोची संख्या कमी झाली आहे का? यावर अभ्यास करण्यासाठी बीएचएनएस संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. आणि आम्हाला सांगण्यास आनंद होत आहे की प्रकल्प सुरू झाल्यापासून आजपर्यंत फ्लेमिंगोवर त्याचा कोणताही परिमाण झालेला नाही असेही गोविंद राज म्हणाले.
रिंगरूटमुळे होणार एमएमआरचा कायापालट -
शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतूमुळे सप्टेंबर 2022 पासून मुंबई ते नवी मुंबई प्रवास केवळ 20 ते 25 मिनिटांत होणार आहे. मात्र त्याचवेळी याहीपेक्षा मोठा दिलासा एमएमआरमधील जनतेला मिळणार आहे. तो म्हणजे पुढील 10 वर्षात एमएमआर मधील नागरिकांचा प्रवास सुपर-सुपर फास्ट होणार आहे. कारण 2030 पर्यंत मुंबईतील कोस्टल रोड, शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतू, नवी मुंबई कोस्टल रोड, विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर आणि विरार-भाईंदर पूल असे प्रकल्प पूर्ण होऊन ते एकमेकाशी जोडले जाणार आहेत. तेव्हा मुंबईतून कोस्टल रोडवरून शिवडी-नाव्हा-शेवा सागरी सेतुने नवी मुंबईला येता येणार आहे. तर येथून सिडकोच्या कोस्टल रोडवरून नवी मुंबईत पनवेलला जाता येणार आहे. त्याचवेळी मल्टीमॉडेल कॉरिडॉर ही या दोन्हीला जोडला जाणार असल्याने नाव्हा-शेवावरून अलिबाग ते विरार आणि पुढे विरार ते भाईंदर प्रवास विरार-भाईंदर पुलाद्वारे जाता येणार आहे. एकूणच चारही बाजूने प्रवास करता येणार असून हा प्रवास फास्ट आणि सिग्नल फ्री असणार असल्याने ही खूप मोठी उपलब्धी असणार असल्याचेही गोविंद राज यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -विधान परिषद निवडणूक : ५८ वर्षांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला नागपुरात खिंडार, पुण्याचाही गड केला काबीज
हेही वाचा -हैदराबाद महापालिका निवडणुकीवरून ओवेसींचा भाजपवर निशाणा