मुंबई Prakash Ambedkar Congress Offer : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तसेच काँग्रेस पक्ष (Congress) हा संविधानानं (Constitution Day २०२३) आखून दिलेल्या मार्गावर जनतेसोबत संविधानाच्या रक्षणासाठी अविरत वाटचाल करत आहे. संविधानाच्या आरक्षणासाठी उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीमागे निस्वार्थीपणे काँग्रेस आपले बळ लावत असते. संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आयोजित केलेल्या 'संविधान रक्षण' सभेला राहुल गांधी यांनी शुभेच्छा पाठवून संविधानाप्रती आपली श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त केली. म्हणूनच अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं 'घर घर संविधान अभियान' राबवणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दिली.
अराजकता पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न :2014 पासून देशाच्या एकतेला आणि जातीय सलोखा यांना ग्रहण लागले आहे. देशामध्ये दोन धर्मामध्ये अथवा दोन जातींमध्ये अराजकता पसरवण्याचा जाणीवपूर्वक काही विघातक शक्तींकडून प्रयत्न केला जातो. या सगळ्या प्रयत्नांना चाप लावायचा असेल तर एकच सशक्त उत्तर आहे आणि ते म्हणजे देशाचे संविधान. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आखून दिलेल्या संविधानाच्या मार्गावर हा देश चालला तर तो नेहमीच प्रगतीपथावर राहील. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. मात्र, देशांमध्ये असलेली शांतता आणि एकात्मता काही विशिष्ट शक्तींना बघवत नाही. त्यामुळेच सातत्याने संविधानावर आणि संविधानिक मूल्यांवर हल्ले केले जात आहेत, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
सनातनी शक्ती जातीय विष पेरते :संविधानाच्या वाटेवर काँग्रेस पक्षाने नेहमीच वाटचाल केली आहे. या देशाला एकत्र बांधून ठेवण्यात केवळ संविधानच कार्य करू शकते याचा गाढा विश्वास आणि श्रद्धा पक्षाला आणि आपल्याला स्वतःला आहे. संविधानावरील याच निष्ठेमुळे देशात आणि राज्यात सनातनी शक्ती जातीय विष पेरण्याचा प्रयत्न करीत असताना संविधानाचे अमृत घराघरात जाणे गरजेचे आहे. तरच इथली शांतता आणि एकात्मता टिकून राहील. यासाठी आपण 'घर घर संविधान' हे अभियान अमरावती जिल्ह्यात राबवणार असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.