मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. त्यापार्श्वभूमीवर १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आले होते. कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लॉकडाऊनमधून शिथिलता दिली जाणार आहे. सध्या सकाळी ७ ते सकाळी ११ पर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू आहेत. १ जूनपासून इतर दुकाने सुरू करण्याची परवानगी देताना सम विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. यामुळे मुंबईकरांनासह दुकानदारांना दिलासा मिळला आहे.
रुग्णसंख्या वाढल्याने लॉकडाऊन -
मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासून देशभरात लॉकडाऊन लावण्यात आले. मुंबईमध्ये जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या आटोक्यात आली. फेब्रुवारीत लोकल ट्रेनमध्ये सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिल्याने तसेच बार, पब, हॉटेल, मार्केट, मॉल उघडल्याने नागरिकांची गर्दी वाढली. त्यामुळे मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आली. रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने नाईट कर्फ्यु, जमावबंदी लागू केली. विकेंड कर्फ्युही लावला. त्यानंतरही रुग्णसंख्या कमी न झाल्याने १४ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आले.
१ जून पासून नवी नियमावली -
लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर पावसाळा जवळ येत असल्याने त्यासाठी तयारी करता यावी अशी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मुंबईत रुग्णसंख्या कमी होत आहे. ७ ते ११ हजारपर्यंत गेलेली रुग्णसंख्या हजारावर आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शिथिलथा देण्याचा विचार करण्यात येत आहे. लाॅकडाऊन शिथिल करण्याबाबत राज्य सरकारला विनंती केली जाणार आहे. राज्य सरकारने हिरवा कंदील दिला तरी सुरुवातीला काही दिवस सकाळी रस्त्याच्या एका बाजुची दुकाने सुरु ठेवणे तर दुपारनंतर रस्त्याच्या दुसऱ्या बाजुची दुकाने सुरु ठेवण्याबाबत किंवा एक दिवस रस्त्याच्या एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्याबाबत पालिका विचार करत आहे. याबाबत राज्य सरकार व मुंबई महापालिका १ जूनला नवीन नियमावली जाहीर करणार असल्याचे सुरेश काकाणी यांनी सांगितले.