महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार - ravi raja on BMC Mayoral Election

मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. निवडणूक स्वबळावर लढावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असे पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.

काँग्रेस
काँग्रेस

By

Published : Nov 19, 2020, 5:23 PM IST

Updated : Nov 19, 2020, 9:02 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकासआघाडी एकत्र लढणार अशी चर्चा होती. मात्र, याला पूर्णविराम लागला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा काँग्रेसने केली. पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. काँग्रेस विरोधी पक्षात बसली आहे. मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत बसलेल्यावर अंकुश लावण्याचे आम्ही काम करत आहोत. गेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन पुन्हा येईन असे म्हटले होते, मात्र ते काही परत आलेले नाहीत. सध्या वातावरण बदलेले आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना आहे. महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांनी घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले मत मांडले असून निवडणूक स्वबळावर लढावी ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष श्रेष्ठी आणि मुंबई अध्यक्ष घेतील. पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले.

रवी राजा - विरोधी पक्षनेते, मुंबई महानगरपालिका

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने 'मिशन मुंबई'ची घोषणा करत 2022 साठी कंबर कसली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपावर भाजपाचा भगवा फडकेल, असा दावा केला आहे. यामुळे मुंबईत शिवसेना, भाजपा आणि काँग्रेस अशी लढत पाहायला मिळणार आहे. सन 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. तथापि, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिकेत 2022 मध्ये भाजपचीच सत्ता येणार असे म्हटलं आहे.

भाजपाचा संकल्प -

मुंबई महापालिकेवर गेले 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्तेच्या काळात भाजपा शिवसेनेचा मित्रपक्ष होता. मात्र, गेल्या वर्षी शिवसेना आणि भाजपाची युती तुटल्यावर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केले. शिवसेनेने सरकार स्थापन केल्याने भाजपाने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला. महापालिकेतही भाजपा विरोधी बाकावर बसली. भाजपाने विरोधी बाकावर बसून शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही. कालच झालेल्या भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबई महापालिकेवर स्वच्छ भगवा फडकवण्याचा संकल्प करत मिशन महापालिका 2022 ची घोषणा केली आहे.

तिहेरी लढत पाहायला मिळणार -

मुंबई महापालिकेची निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यावेळी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी हे सर्व पक्ष वेगळे निवडणूक लढले होते. आता महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. ही निवडणूक भाजपा विरोधात महाविकास आघाडी अशी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र काँग्रेसनेही स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे आता ही निवडणूक तिहेरी होईल. शिवसेना, भाजपा, काँग्रेस अशी ही निवडणूक लढवली जाईल. शिवसेनेची राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्या सोबत युती होऊ शकते.

पालिकेतील संख्याबळ

शिवसेना - 96 ,भाजपा - 84, काँग्रेस - 29, राष्ट्रवादी - 9, समाजवादी - 6, एमआयएम - 2, मनसे - 1

देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर -

महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवण्याचा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावर बोलताना, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेणं भाजपासाठी योग्य असल्याचे राऊत यांनी म्हटलं. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही. आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध आहे, असं भाजपला वाटत असल्यास त्याचा निर्णय जनता घेईल, असे राऊत म्हणाले. आज जो भगवा फडकतोय, तो कधी उतरलाच नाही. तुम्ही आज भगवा उतरवण्याच्या कामाला लागला आहात. म्हणजेच तुम्हाला एकाप्रकारे ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचा आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

Last Updated : Nov 19, 2020, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details