मुंबई- बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. त्यामध्ये काँग्रेसची बेसुमार कामगिरी पाहाला मिळाली. मात्र, बिहार निवडणुकीत काँग्रेसची पीछेहाट झाली नाही, तर उलट मतांचा टक्का वाढला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. सातारा आणि ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांचा पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश पार पडला. त्यावेळी बोलताना थोरातांनी ही प्रतिक्रिया दिली.
'बिहारमध्ये काँग्रेसची पीछेहाट नाही तर मतांचा टक्का वाढला' - पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर समाधानी असल्याचे मत महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे. बिहारमध्ये काँग्रेसची पीछेहाट झाली नसून उलट मतांचा टक्का वाढला असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसला ज्यांचा फायदा होईल अशांना पक्षात प्रवेश - प्रदेशाध्यक्ष-
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसकडून मोठे यश मिळविण्यात आले आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसला ज्या लोकांचा फायदा होईल, अशा लोकांना पक्षात प्रवेश देण्यात येईल. बिहार निवडणुकीच्या कामगिरी बाबत बोलताना पुढे थोरात म्हणाले, की काँग्रेसच्या विचारधारेशी निगडीत असे आणखीन काम करण्याची गरज आहे. बिहारमध्ये काँग्रेसची पीछेहाट झालेली नसून काँग्रेसला मिळणाऱ्या मतांचा टक्का हा वाढला आहे. तसेच जे आधी काँग्रेसमधून बाहेर पडले होते, त्या नेत्यांसोबत इतर पक्षातील नेते देखील काँग्रेस मध्ये येणाऱ्या काळात सामील होतील, असा विश्वासही थोरातांनी यावेळी व्यक्त केला.
त्या जागांवर काँग्रेसचा हक्क-
राज्यातील शिक्षक मतदारसंघातील पाच जागांची निवडणूक होत आहे. अमरावतीची जागा ही शिवसेनेला देण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसचा अधिकार राहील असेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
बिहारच्या निकालावर समाधानी- पृथ्वीराज चव्हाण
बिहार निवडणुकांच्या निकालावर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही बिहारमध्ये 70 जागा लढवल्या होत्या. मात्र , जागा जरी अधिक मिळाल्या नसल्या तरी आम्हाला मिळणार्या मतांची टक्केवारी ही वाढली आहे. सद्य स्थितीत आम्ही बिहार निकालावर समाधानी आहोत. मात्र, आणखी काही जागा जिंकता आल्या असता, असा दावाही त्यांनी यावेळी केला.