मुंबई :राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गट आमचाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीत कोणतीही फूट नसल्याचे वक्तव्य केल्यानं राजकारणात चर्चेला उधान आलं आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून अजित पवार राष्ट्रवादीत परत येणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या दाव्या-प्रतिदाव्यामुळं मात्र, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे.
अजित पवार राष्ट्रवादीत परतणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अनुभवी नेते असून त्यांची भेट घेऊन परत यावे, असे अजित पवार त्यांना वाटले असेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मन वळवण्यात शरद पवार यशस्वी झाल्याचं शरद पवार यांच्या वक्तव्यावरून दिसून येतं. त्यामुळे अजित पवार स्वगृही परततील असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीत शरद पवारांबाबत कोणताही संभ्रम नसल्याचेही पटोले म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. राष्ट्रवादीत काय सुरू आहे, त्यांनी काय करावे, यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. जे पक्ष भाजपाविरोधात लढायला येतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल, असे मी दोन वर्षांपासून सांगत असल्याची आठवण पटोले यांनी करून दिली.
आम्ही महायुती सोबतच :सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारे आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. आम्ही निवडणूक आयोगालाही तसे कळवलं आहे. आमच्या दृष्टीनं कोणताही गोंधळ नाही. आम्ही एनडीएच्या बैठकीला गेलो होतो. अजित पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. आम्ही बीडमध्ये सभा घेत आहोत. निवडणुकीला अजून सात ते आठ महिने आहेत. आम्ही महायुतीत निवडणुका लढवणार असून राज्यात वेगळे निकाल पाहायला मिळतील, असा विश्वास अजित पवार गटाचे प्रवक्ते सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
पवार, सुळेंचे वक्तव्य विरोधाभासी :पवार काय म्हणाले ते ऐकलं नाही. सुप्रिया काय म्हणाल्या ते ऐकलं. ते म्हणाले की, अजितदादा हे ज्येष्ठ नेते आहेत. दादा उपमुख्यमंत्री आहेत. एकीकडे 9 मंत्र्यांवर कारवाई होणार, असं शरद पवारांचा गटाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे आमचेच नेते असल्याचं ते सांगतात. हा विरोधाभास आहे. काँग्रेसचे महान नेते काय म्हणाले ते मला माहीत नाही. काँग्रेसने आपले घर सांभाळावे. घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. आमच्या मनात कोणताही गोंधळ नाही. बीडच्या सभेत पुन्हा आमची भूमिका मांडणार असल्याचंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.