मुंबई -पेगासस (pegasus) स्पायवेअर रिपोर्टवरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. या स्पायवेअरद्वारे देशातील काही नेते आणि पत्रकारांचे फोन टॅप केल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
'पेगाससमुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा'
'पेगासस स्पायवेअरचा वापर करून कर्नाटक राज्यातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला', असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. तसेच, 'मध्य प्रदेशमध्ये देखील याचा वापर झाला. यामुळे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. केंद्र सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांअंतर्गत समितीकडून चौकशी व्हावी', अशी मागणी नाना पटोलेंनी केली आहे.
माझाही फोन टॅप... - नाना पटोले
'2016-17 मध्ये माझा फोन टॅप होत असल्याची माहिती मी राज्य सरकारला दिली होती. त्यामुळे हे सर्व प्रकरण गंभीर असून, याची चौकशी होणे गरजेचे आहे', असेही नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
डीजीआयपीआरचे अधिकारी इस्राईलला का गेले?
'राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार असताना डीजीआयपीआरचे काही अधिकारी इस्राईल देशात गेले होते. मात्र अद्याप हे अधिकारी कशासाठी इस्राईलला गेले होते, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे याबाबत देखील तत्काळ कमिटी तयार करून संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी', अशी मागणी करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
'कोरोनामुळे लोकांचे गेलेले जीव हे केंद्र सरकारचे पाप'
'राज्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणाचाही जीव गेलेला नाही. मात्र, नाशिक येथे रुग्णालयात ऑक्सिजन वाहून नेणारी पाईपलाईनला गळती लागल्यामुळे अपघात झाला होता. या अपघातात काही रुग्णांचे प्राण गेले. ही दुर्घटना भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारामुळे घडली होती. नाशिक महानगर पालिकेच्या अधिकाराखाली येणाऱ्या रूग्णालयात ही दुर्घटना घडली', अशी टीका पटोले यांनी केली. तसेच इतर ठिकाणी ऑक्सिजन अभावी ज्या लोकांचा मृत्यू झाला. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप त्यांनी केला.
'केंद्रामुळे राज्यात लॉकडाऊनची वेळ'
'अद्यापही राज्याला केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा योग्यरीत्या केला जात नाही. लसीकरण मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे राज्याला लॉकडाऊनचा पर्याय वापरावा लागत आहे', अशी खंतही नाना पटोले यांनी व्यक्त केली.
पेगाससवरून काँग्रेस आक्रमक, राजभवनासमोर करणार निदर्शने -
पेगाससवरून संसदेच्या अधिवेशनात गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी गदारोळ घातला आहे. याच मुद्द्यावरून आता राज्यातील काँग्रेसही आक्रमक झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व विधीमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे नेते गुरूवारी (22 जुलै) दुपारी साडेतीन वाजता राजभवनासमोर निदर्शने करणार आहेत. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत. तसेच, वाढत्या इंधन दरवाढ आणि महागाईबद्दलही निवेदन देणार आहेत.
'मंत्रीबदलाबाबत चर्चा नाही'
'दिल्लीमध्ये 20 जुलै रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा झाली. मात्र या चर्चेत कोठेही राज्यातील काँग्रेसचे मंत्री बदलाबाबत चर्चा झाली नाही. राज्यातल्या काँग्रेस मंत्र्यांचा कोणताही रिपोर्ट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आलेला नाही. काँग्रेसचे मंत्री हे उत्तम काम करत आहेत. त्यामुळे सध्यातरी दिल्लीमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना डच्चू देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही', असे नाना पटोले यांनी सांगितले.
'काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी स्वबळाचा नारा'
राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मात्र राज्यात एखाद्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेशी आघाडी करावी लागल्यास त्याबाबत दिल्लीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असंही नाना पटोले यांनी सांगितले.
पॉर्न फिल्मचे शूटिंग राज्यात तत्कालीन देवेंद्र फडणीस सरकार आल्यापासून सुरू झाले, असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
तर, लक्ष्मण रेषा ओलांडली म्हणून रामायण झाले. द्रौपदीचे वस्त्रहरण झाले म्हणून महाभारत झाले. तसे आता मोदींनी सर्व पापांची सीमा ओलांडली आहे, अशी टीका ज्येष्ठ गांधीवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी (kumar saptarshi) यांनी केली आहे.
हेही वाचा -कोरोनाकी महामारी, परेशान है नारी, मेरे पे आई अॅडमिट होने की बारी...; आठवलेंच्या कवितेवर सभागृहात हशा