मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केली होती, असे आयआयएमएस पॅनेलचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी अधिकृतरित्या सांगितले आहे. यामुळे या प्रकरणावर महाराष्ट्राची अहोरात्र बदनामी करणाऱ्या भाजप आणि आयटी सेलच्या मास्टरमाइंडची एसआयटी नेमून चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
सुशांतसिंह प्रकरणी गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनंतर सावंत यांनी ट्विट करून भाजप आणि भाजपच्या आयटी सेलवर जोरदार हल्ला चढवला. सुशांतने आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती दिल्यानंतर तपास केल्याने हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून करण्यात येत असलेला तपास प्रामाणिकपणे सुरू होता, हे देखील स्पष्ट होते. मात्र, तरीही 'गोदी मीडिया' आणि त्यांच्या मित्रांच्या मदतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र केंद्र सरकारही करत होते, असा आरोपही सावंत यांनी केला.