मुंबई -कंगना राणौतने ज्याप्रकारे मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी केली त्यामागे तिचे शब्द आणि एकूणच त्यासाठीचे कारस्थान हे भाजपचे नेते करत होते, ते आता उघड पडले असल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी कंगना राणौत यांच्या ट्वीटचा आधार घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
भाजपने तिला बोलण्यासाठी पाठवले होते
सचिन सावंत म्हणाले, कंगनाने काल (रविवार) ज्याप्रमाणे ट्विट केले आणि त्यातून तिने आपला कबूलनामाच दिला आहे. मागील काळात तिने महाराष्ट्राची बदनामी केली. तसेच मुंबई पोलिसांचा माफिया म्हणून उल्लेख केला तसेच मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख हा तिच्याकडून सतत केला जात होता. त्यामागे भाजपने कारस्थान रचले होते, ते कंगनाच्या माध्यमातून केले जात होते हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे तिला भाजपने तिला यावर बोलण्यासाठी पाठवले होते हेही यातून दिसून येते, असा दावाही सावंत यांनी केला.