महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतसिंह प्रकरण : 'मुंबई पोलिसांना बदनाम करण्यामागे भाजपा आयटी सेल'

मुंबई पोलिसांना बदनाम करण्यामागे भाजपा आयटी सेल आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. याप्रकरणी सावंत यांनी आज (बुधवारी) मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली.

sachin sawant, congress spokesperson
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

By

Published : Oct 7, 2020, 4:34 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांनी बदनाम करण्यामागे एक विशिष्ट प्रपोगंडा राबवण्यात आला, ज्यामध्ये भाजपा आयटी सेलने महत्त्वाची भूमिका बजवली, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्यांनी आज (बुधवारी) मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी मुंबई पोलीस, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविषयीसुद्धा अश्लील भाषा वापरणाऱ्या बनावट अकाऊंट्सचे पुरावे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांना सोपवले.

याप्रकरणी माहिती देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत.

भाजपाकडून सुशांतसिंह प्रकरणी सामाजिक दहशतवादाचा (social terrorisms) वापर करण्यात आला आहे. बिहारमधील निवडणुकांसाठी सुशांतच्या मृत्यूचा अजेंडा करून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची जाणूनबुजून बदनामी करण्यात आली, असा आरोप सचिन सावंत यांनी केला. मुंबई पोलिसांवर टीका करण्यासाठी सोशल माध्यमांवर हजारोंच्या संख्येने बनावट अकाऊंटवरुन शिवीगाळ केली आणि एक अजेंडा चालविणाऱ्यांच्या विरोधात कारवाई तत्काळ करावी, अशी मागणी सांवत यांनी केली. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची भेट घेतली.

काय आहे सुशांतसिंह प्रकरण?

या वर्षी 14 जून हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिह राजपूत याने मुंबईतील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. यानंतर अनेक वादविवाद निर्माण झाले. सुशांतसिंहच्या आत्महत्येला हिंदी चित्रपटसृष्टीत घराणेशाही आहे, असा आरोप अनेक स्तरातून करण्यात आला. तसेच याप्रकरणी अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यांनी आपली मते नोंदवली आहे. तसेच अभिनेत्री कंगना रणौतनेसुद्धा यात उडी घेत या प्रकरणाला नवे वळण दिले होते. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत होते. मात्र, मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. तसेच याप्रकरणाचा तपास करत असताना यात ड्रग्सप्रकरणाचाही संबंध समोर आला आहे. याप्रकरणी सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली होती. सुशांतसिंह ड्रगप्रकरणाचा तपास सध्या एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड करत आहे. दरम्यान, जवळपास एक महिन्यानंतर रिया चक्रवर्तीला आज (बुधवारी) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. याआधी तिचा जामीन फेटाळण्यात आला होता. तर याप्रकरणी तिच्या भावालाही एनसीबीने अटक केली आहे. त्याला जामीन नामंजूर करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details