मुंबई- राज्यामध्ये आपण बघतो आहोत की विरोधी पक्षाकडून कोणत्याही विषयावरून राजकारण केले जात आहे. मात्र, महापालिकेत विरोधी पक्षात असलेली काँग्रेस विरोधाला विरोध न करता मुंबईकरांच्या विकासाला साथ देत आहे. मुंबईचा विकास आणि मुंबईसाठी आपण एकत्र असणे गरजेचे, असे म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसला पालिका निवडणुकीत सोबत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, काँग्रेसने आधीच स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे, असे सांगत महापौरांचा आवाहनाला नकार दर्शवला आहे.
मुंबईसाठी एकत्र असले पाहिजे
मुंबई महापालिकेच्या वतीने विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या प्रयत्नाने विशेष निधीतून 'एफ उत्तर' विभागातील प्रभाग क्र. 176 मधील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत संगणक आणि टॅब वाटप करण्याचा कार्यक्रम गुरुनानक हायस्कूल, सायन कोळीवाडा येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री महापौर वर्षा गायकवाड, महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर बोलत होत्या. यावेळी बोलताना महापौरांनी भाजपचा समाचार घेतला. भाजपकडून कोणत्याही विषयावर विरोध केला जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई महापालिकेत रवी राजा यांच्यासारखे विरोधी पक्ष नेते आहेत. ते मुंबईच्या विकासाच्या प्रत्येक प्रस्तावाला साथ देतात आणि जिथे चुकीचे आहे तिथे चुकीचे आहे म्हणतात. पालिका आयुक्तांकडे किंवा प्रशासनाकडे एखादा विषय मांडताना ते योग्य प्रकारे मांडतात. यामुळे मुंबईच्या विकासासाठी आपण एकत्र असले पाहिजे, असे आवाहन महापौरांनी केले.
नोकरी देणारे बना
आमच्यावेळी खेळ होते, खेळामध्ये प्राविण्य असायचे. आता विद्यार्थी ऍडव्हान्स झाले आहेत. या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तू देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येत आहेत. लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांचे कणा बनत आहेत. विद्यार्थ्यांनी या टॅब आणि लॅपटॉपच्या माध्यमातून मिळणाऱ्या शिक्षणातून तुम्ही सक्षम व्हाल तेव्हा आपल्या बाजूच्या दोन जणांना मदतीचा हात द्या, असे झाल्यास शिकणापासून कोणीही वंचित राहणार नाही. नोकरी करणारे नका, नोकरी देणारे बना. स्वतःचे व्यवसाय उभे करा, असा सल्ला महापौरांनी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षण मंत्र्यांकडून पालिकेचे कौतुक
राज्यात गेले दीड वर्षे कोरोनाची लाटा आहे. सध्या तिसरी लाट, डेल्टा प्लसची चर्चा सुरू आहे. आमच्यासाठी राज्यातील नागरिक महत्वाचे आहेत. त्यानुसार निर्णय घेतले जात आहेत. ज्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रसार नाही, अशा ठिकाणी शाळा सुरू केल्या आहेत. मुंबई आणि इतर ठिकाणी शाळा कधी सुरू होईल माहीत नाही. मात्र, ऑनलाइन शिक्षणामुळे मूल आता टेक्नोसॅव्ही झाली आहेत. सरकारही आता त्या प्रमाणे काम करत आहे. पालिकेने शिक्षणाबाबत जो निर्णय घेतला त्याचे कौतुक केले पाहिजे. देशाचे भविष्य आणि संपत्ती मुले आहेत. त्यांना मदत केली पाहिजे, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.