मुंबई- राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील आमदारांशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधला. यामध्ये त्यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी दोन्ही बाजूने काय मत आहे? हे जाणून घेतले असल्याची माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विषय मार्गी लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. यासाठी लवकरच सोनिया गांधींकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे. आज दिल्ली येथे काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत देखील शिवसेनेला पाठिंबा देणे विषयीचे एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काही वेळापूर्वी राज्यातील आमदारांचे दूरध्वनीवरून याविषयीचे मत जाणून घेतले. त्यात बहुतेक आमदारांनी राज्यात शिवसेनेला पाठिंबा देण्यापासून ते थेट सत्तेत सहभागी होण्यापर्यंतची आपली मते व्यक्त केली असल्याचे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.