मुंबई - राज्यात आणि देशात कोरोनाचे महाभयंकर संकट उभे टाकले असताना त्यासाठी आम्ही राज्य सरकार म्हणून वेळीच तयारी सुरू केली. परंतु, केंद्र सरकारने त्यासाठी दिरंगाई केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. केंद्राने दिरंगाई केली तरी आम्ही मात्र राज्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात थोरात यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊन व जनतेला मदत करण्यासंदर्भात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व पदाधिकारी यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, की कोरोना विषाणूचे संकट जगभर गंभीर झाले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. जगभर थैमान घालणाऱ्या या आजाराबाबत आपले महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार फार लवकर सतर्क झाले होते. आपण फेब्रुवारी महिन्यापासूनच काळजी घ्यायला सुरुवात केली होती.
आपले नेते राहुल गांधी यांनी 12 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्र सरकारला येणार्या संकटाची जाणीव करून दिली होती. मात्र, केंद्र सरकारने राहुलजींचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. अखेर कोरोनाचे संकट देशात सर्वदूर पसरल्यानंतर 24 मार्चला केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी संपूर्ण देश 21 दिवसांसाठी लॉकडाउन केला. हे लॉकडाऊन करताना केंद्र सरकारने गरीब घटकांच्या, असंघटित कामगारांच्या आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या उदारनिर्वाहाचा काहीही विचार केलेला दिसत नाही.
कोरोनाच्या संकटात आपल्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि आपले नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. त्यासाठी धोरणात्मक कार्यक्रमाची आखणी पक्षाने केली असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
राज्यातील सर्वांना अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचल्या पाहिजेत, ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व जिल्हा काँग्रेस समित्यांना जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत गरीब लोकांना अन्नधान्य, औषधे व जीवनावश्यक वस्तू मिळतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे, गहू, तांदूळ, डाळ, औषधे आदी वस्तूंचे वाटप काँग्रेस पक्षाच्या वतीने केले पाहिजे. हे वाटप करताना अनावश्यक गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळलाच पाहिजे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी छोटे गट करून सोशल मीडियाचा वापर करून स्वत: चे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही, याची दक्षता घेऊन हे काम करावे.
शेतकऱ्यांना शेतमालाची काढणी करताना, शेतमालाची विक्री करताना काही अडचणी आल्यास तपासून त्या मार्गी लावाव्यात. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाचे संकलन करताना काही अडचणी येत असतील तर त्याही मार्गी लावाव्यात आणि शेतकऱ्यांना मदत करावी. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी आस्थापने, बांधकाम क्षेत्र, तात्पुरती कामे सर्व स्थगित केलेली आहे. त्यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांची उपासमार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि त्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी.
गरीब लोकांना सॅनिटायझरचे वाटप करणे. आवश्यकता असेल त्यांना मास्कचे वाटप करावे. बेघर तसेच ज्यांच्या जेवण्याची सोय नाही त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करणे. यासोबतच या कठीण काळात काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा व लोकसभा सदस्यांनी आपल्या स्थानिक विकास निधीमधून आपल्या मतदारसंघ आणि राज्यातील दवाखान्यांना कोरोनाचा मुकाबल्यासाठी सज्ज करण्यासाठी मदत करावी. विधानसभा व विधानपरिषद सदस्यांनी आपल्या मतदारसंघात आणि राज्यात लोकांना मदत करणारे उपक्रम राबवावेत. जिल्हा काँग्रेसने ब्लॉक काँग्रेस कमिट्यांना सूचना देऊन केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेली मदत नागरिकांना मिळेल, यासाठी तत्पर रहावे ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे या पत्रात थोरात यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्यास आहेत.