मुंबई -महापालिकेत प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची कामगिरी अव्वल असून भाजप तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. मुंबईत चांगले काम करत असल्याचे प्रमाणपत्र प्रजा फाऊंडेशनने दिल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल, असे काँग्रेसचे नगरसेवक व विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्ष नेते रवी राजा प्रजा फाऊंडेशन या एनजीओकडून महापालिकेतील नगरसेवकांचे सभागृहातील विचारविनिमय, त्यांचे कामकाज आणि त्यांच्या मतदार संघातील कामांबद्दलचे विश्लेषण यावर मुंबई प्रेस क्लब येथे नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक प्रसिद्ध करण्यात आले. या अहवालानुसार प्रजा फाऊंडेशनने काँग्रेसला ६१.९६ टक्के गुण देऊन काँग्रेस पक्षातील नगरसेवक चांगले काम करत असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. याच अहवालात सत्ताधारी शिवसेनेला ६१.६१ टक्के गुण देऊन दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. तर स्वतःला पहारेकरी म्हणवणाऱ्या भाजपला ५९.५४ टक्के गुण देत तिसरा क्रमांक दिला आहे.
हेही वाचा -अन्नसुरक्षेसाठी रासायनिक शेतीला पर्याय नाही; झिरो बजेट शेतीवर आरसीएफचेही प्रश्नचिन्ह
प्रजा फाऊंडेशनने प्रसिद्ध केलेल्या या अहवालाचे पालिकेतील विरोधी पक्ष नेते व काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले, आमचे नगरसेवक कमी असले तरी मुंबईकरांचे प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवत असल्याने प्रजा संस्थेने आम्हाला पहिला क्रमांक दिला आहे. केंद्रात राज्यात तसेच महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांकडून नागरिकांची कामे केली जात नसल्याने त्यांना दुसरा आणि तिसरा क्रमांक दिला आहे.
निवडणुकीत काँग्रेसला फायदा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरु असतानाच प्रजा फाऊंडेशनचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात काँग्रेस प्रथम, शिवसेना दुसऱ्या तर भाजपा तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे. या अहवालामुळे काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये चांगले काम करत असल्याचे सिद्ध झाले आहे. काँग्रेस पक्षाकडून नागरिकांचे प्रश्न योग्य प्रकारे सोडवले जात आहेत. मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार निवडून देण्याचे आवाहन करणार असल्याचेही रवी राजा यांनी सांगितले आहे.