मुंबई - संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि महापुरासारख्या आपत्तीत सापडले आहे. अशा परिस्थितीत आपत्तीग्रस्त जनतेला वाऱ्यावर सोडून पुन्हा निवडून यायचेच, असा चंग बांधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'महाजनादेश' यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठ्या घोषणा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यावर काँग्रेस पक्ष राज्यभर 'महापर्दाफाश' सभांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खोटारडेपणाचा पोलखोल करणार आहे. येत्या सोमवारी (दि २६) अमरावती येथे पक्षाची पहिली महापर्दाफाश सभा होणार आहे.
राज्याच्या निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख आणि माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली ही महापर्दाफाश सभा होणार आहे. पहिल्या महापर्दाफाश शुभारभांच्या सभेस ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आ. के. सी. पाडवी, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, खा. बाळू धानोरकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा चारुताई टोकस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह एनएसयुआय, अल्पसंख्याक, मागासवर्गीय तसेच इतर विभागाचे अध्यक्ष, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणूक प्रचार समितीचे मुख्य समन्वयक आणि प्रवक्ते डॉ. संजय लाखे-पाटील यांनी दिली आहे.